माझे कुटुंब, माझी जबाबदारी'चे यश
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना वरील लसीचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत तसेच प्रमाण ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये वित्त नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्यसेवा आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख सदस्य असतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यात दोन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेत प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली असून अकरा कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्यविषयक डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. यामध्ये ५१ हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

0 टिप्पण्या