कोरोना रोखण्यासाठी मुंबईची नाका-बंदी
रस्ता मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी
मुंबई, दादासाहेब येंधे : दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक केल्यानंतर आता महापालिका प्रमुख रेल्वे स्थानके आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर पथक तैनात करणार आहे. कोविड चाचणीचा अहवाल दाखवल्याशिवाय प्रवाशांना मुंबईत प्रवेश दिला जाणार नाही.
देशातील काही राज्यांत कोविड ची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी न केलेल्या प्रवाशांसाठी त्यांची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना महापालिकेने विमानतळ प्रशासनाला केली आहे. मुंबईतील जंक्शन आणि महत्त्वाच्या स्थानकांवरही पालिका पथक तैनात ठेवणार आहे. प्रवाशांकडून कोविड चाचणीचा अहवाल तपासला जाणार आहे. अहवाल नसल्यास रेल्वेस्थानकांवर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशाला कोविड उपचार केंद्रात किंवा गरजेनुसार रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवेशद्वारांवर पालिकेचे पथक तैनात करण्यात येणार आहे.
रस्ते मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे एक ते दोन दिवसांपूर्वीचे कोविड अहवाल तपासले जाणार आहेत. कोविड चाचणी न केलेल्या प्रवाशांची तात्काळ चाचणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या