मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे गुपचूप व्हिडीओ काढून 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अश्लील स्वरूपात मॉर्फिंग करणाऱ्या तरुणाला दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो असे व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर प्रसारित करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
चर्चगेट ते विरार फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून २२ जूनला रात्री ८.३०च्या सुमारास १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी तिच्या मैत्रिणींसह प्रवास करत होती. त्यांच्या नकळत आणि संमतीशिवाय एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर 'एआय'च्या मदतीने या व्हिडीओचे मॉर्फिंग करून तो अश्लील गाण्यासह रीलच्या स्वरूपात 'pile६५३१' या इन्स्टाग्राम आयडीवरून प्रसारित करण्यात आला. ही रील एक लाखहून अधिक जणांनी पाहिली. हा प्रकार संबंधित तरुणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रकरणाचे गांभीर्य आणि महिलांची होणारी बदनामी लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त बजरंग बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फातिमा बागवान, सहायक पोलिस निरीक्षक ईशान खरोटे, तसेच नितीन शिंदे आणि रेश्मा धुमाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला.
सुरुवातीला आरोपीचे नाव, चेहरा किंवा कोणतीही ठोस ओळख पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. आरोपीने 'Playboy' या नावाने आणि एका मुलीचा फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर मूळचा उत्तर प्रदेशचा आणि सध्या वसई येथे राहणाऱ्या साबीर मोहम्मद रुस्तम (३२) याला अटक करण्यात आली. इन्स्टाग्रामवर अधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी तो 'एआय'च्या मदतीने महिलांचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून प्रसारित करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

0 टिप्पण्या