Ticker

6/recent/ticker-posts

परदेशी ई-सिगारेटचा साठा जप्त, केरळच्या १९ जणांच्या आवळल्या मुसक्या; पायधुनी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुंबई, दादासाहेब येंधे : परदेशी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा बेकायदेशीर साठा करून त्यांचे वितरण, विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी १९ जणांच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. मस्जिद बंदर पश्चिम येथील हॉटेल स्टार्समध्ये छापेमारी करून पोलिसांनी ७२ लाख २१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पायधुनी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना हॉटेल स्टार्स येथे परदेशी बनावटीच्या सिगारेट आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता साठा वितरण आणि विक्रीसाठी जवळ बाळगल्याच्या आरोपावरून १९ जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी मुजीब हाशिम बकेल अहमद (३१), मोहम्मद मिरझाब मुनीर कुन्नई (२५), मोहम्मद अनफास हसीनर (२०), अश्रफ अब्दुला कोटकुल्लम् (४६), अब्दुल रौफ मोहम्मद (४०), अब्दुल अजमल रोशन (३१), अब्दुल तमीम मोहम्मद हनीफा (२४), मोईदिन नाजी अब्दुल नाजर (२५), रफिक इब्राहीम किडार (३८), अबुबखर सोहेल मोहम्मद (२६), मोहम्मद शाकीर अब्दुल कादर (३२), अबु ताहेर इब्राही अर्नथोड मंजिल (३२), अराफत तोटी हामजा (४१), सुबेरअली मोहम्मद तोटी (४८), मोईदिदन कुन्नी शापी (३०), मोहम्मद रफिक युसेनर उमर (४१), मोईदिदन सुबेर (४१), अब्दुल रहेमान कुनहाली तुपकल (४२) आणि अब्दुल बाशित के. ओ. (३३) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी परदेशी बनावटीच्या ११ हजार ७१० सिगारेट आणि २ हजार १७२ इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ७२ लाख २१ हजार ५५० रुपये आहे. पोलिस उपायुक्त रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ-२), सहाय्यक पोलिस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कदम, पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण,  तसेच कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या