Ticker

6/recent/ticker-posts

असेही शिवबांचे मावळे...

अज्ञात लढवय्यांच्या स्मृतीसाठी परळच्या 'श्री राम समर्थक प्रतिष्ठान'ने पाचाडमध्ये उभारला भव्य चिरेबंदी वाडा!

मुंबई, दादासाहेब येंधे : श्री राम समर्थक  प्रतिष्ठान, मुंबई परेल ही संस्था आणि तिचे अध्यक्ष श्री. राम धुरी हे खरे शिवभक्त आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

कारण राम धुरी यांची रायगड भक्ती, सह्याद्रीची बेफाम भटकंती आणि अज्ञात मावळ्यांप्रती असलेली कृतज्ञता खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यातील संघर्ष आणि अनुभवांचे संकलन अत्यंत मोलाचे आहे. तसेच त्यांचे रायगडाशी  ऋणानुबंध आणि कौटुंबिक नाते आहे कारण याच ऐतिहासिक गडावर त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान योग म्हणावा लागेल. अणुशक्ती विभागाच्या 'गिरीसंचार ग्रुप'मुळे त्यांच्यातील दुर्गप्रेमीला खऱ्या अर्थाने पंख मिळाले. सह्याद्री, सातपुडा, विंध्य ते अगदी हिमालयातील आदी कैलास ॐ पर्वतापर्यंत तुम्ही मनसोक्त भटकंती केली आणि मित्रांनाही या छंदात घडवले. 

तसेच श्री राम समर्थक  प्रतिष्ठान या संस्थेमार्फत TIFR यांनी दिलेल्या एका ट्रकभर फर्निचरचे माणगाव आश्रमशाळा, रायगडवाडी, कोंझर आणि हिरकणीवाडीतील शाळांमध्ये वाटप केले गेले होते. कोरोना काळात स्वप्नील मालवणकर आणि इतरांनी गडावरील पाथरवट कामगार, पोलीस आणि २२ कुटुंबांना २ महिने पुरेल इतकी रसद महाडवरून टेम्पोने खुबलढा बुरुजापर्यंत आणून वाटप केली होती.

किल्ले रायगडावर प्राणांची आहुती देणाऱ्या अज्ञात लढाऊ मावळ्यांच्या, पोलीस व लष्करातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी 'श्री राम समर्थक प्रतिष्ठान' आणि दुर्गप्रेमी राम धुरी (परळ, मुंबई) यांच्या वतीने एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये प्रशासकीय अडचणींवर मात करत, संस्थेने रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात, राजमाता जिजाऊ समाधीसमोर ४१x३२ फुटांचा भव्य चिरेबंदी वाडा उभारला आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने २००१ पासून दरवर्षी पितृपक्षातील चतुर्दशीला गडावर अज्ञात मावळ्यांसाठी श्राद्ध व पूजन विधी केला जातो. गेल्या काही वर्षांत गडावर विधी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय आणि राजकीय अडचणींमुळे दुर्गप्रेमींनी हा पर्याय निवडला. भोसले घराण्याच्या सहकार्याने त्यांच्या खाजगी शेतात हा चिरेबंदी वाडा उभारण्यात आला असून, आता कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय दरवर्षी हा कृतज्ञता सोहळा येथे पार पडणार आहे.



"ज्या अज्ञात मावळ्यांच्या रक्ताने आणि त्यागाने शिवछत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरले, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी अशा वास्तू उभ्या कराव्यात आणि वर्षातून किमान एक दिवस या लढवय्या मावळ्यांचे स्मरण करावे," अशी भावना प्रतिष्ठानचे प्रमुख राम धुरी यांनी व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या