मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांविरोधात मुंबई क्राईम ब्राँचच्या युनिट-७ ने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने एक मोठी कारवाई केली आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागांतील तब्बल ७ क्लिनिकवर टाकलेल्या धाडींमध्ये १० बोगस डॉक्टर कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांपैकी एक डॉक्टर स्वतः एचआयव्ही बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरिवली आणि दहिसर या उपनगरीय भागांमध्ये महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कोणतीही नोंदणी नसताना बेकायदेशीर क्लिनिक चालवली जात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्राँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालिकेच्या वैद्यकीय पथकासह भांडूपमधील संतोष हेल्थ क्लिनिक व विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरी येथील हमदम दवाखाना व कोहिनूर दवाखाना, बोरिवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरचे दीपक हर्बल हेल्थ केयर क्लिनिक आणि मानखुर्द येथील समर आयुर्वेदिक दवाखान्यावर अचानक छापे टाकले.
तपासादरम्यान हे भोंदू डॉक्टर गुप्तरोगांसह अनेक गंभीर आजार बरे करण्याचे दावे करून रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळत असल्याचे उघड झाले. वैद्यकीय अर्हता नसतानाही हे आरोपी अॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा बेधडक वापर करत होते, तसेच काही ठिकाणी रुग्णांना मुदतबाह्य औषधे दिली जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. या धडक कारवाईत पोलिसांनी औषधांच्या बाटल्या, सिरिंज आणि अँटीबायोटिक्ससह सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा बेकायदेशीर वैद्यकीय साठा जप्त केला असून सर्व आरोपींवर भांडूप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या