मुंबई, दादासाहेब येंधे : गर्दी असलेल्या बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा गावदेवी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सात जणांना अटक केली आहे. पोलिसांनी विविध कंपन्यांचे चोरीचे ४२ मोबाईल फोन जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे.
खांबाला हिल बस स्टॉप ते पेडर रोडदरम्यान बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा वनप्लस मोबाईल चोरीला गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. गर्दीच्या बसमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराला धक्का-बुक्की केली आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. मिळालेल्या माहितीवरून मोबाईल चोरीमध्ये सक्रिय असलेल्या कथित संघटित टोळीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी मानखुर्द आणि शिवाजीनगर येथून काही आरोपींना अटक केली, तर या टोळीचा कथित मुख्य सूत्रधार राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आफताब अबाद अन्सारी (२६), हसन अब्बास शेख (३५), चांद मोहम्मद मोहम्मद सुलतान (५३), इम्तियाज इमामअली शेख (४६), आझम अकम कुरेशी (३२), स्वप्नील शंकर सोनावणे (२९) आणि राजब अली मोहम्मद तकी शेख ऊर्फ चिकना (३२) अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे ४२ मोबाईल फोन जप्त केले असून, यामध्ये तक्रारदाराचा चोरीला गेलेला मोबाईलही आहे. जप्त मोबाईलची एकूण किंमत सुमारे १६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0 टिप्पण्या