मुंबई, दादासाहेब येंधे : मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना मुलुंड पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक करून वाहनचोरीची चार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आरोपीकडून सुमारे ३.४५ लाख रुपये किमतीची सहा चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
२५ ऑगस्ट २०२६ रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झालीकरण्यात आली होती. पार्किंगमधून मोटारसायकल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. या तपासातून संदीप नारायण वंजारी (२९), रा. राहुल नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम, याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याचा इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. पुढील तपासात सुमारे ३.४५ लाख रुपये किमतीची सहा वाहने जप्त करण्यात आली असून, वाहनचोरीची चार प्रकरणे उघडकीस आली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंजारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि दरोड्याच्या तयारीसह विविध स्वरूपाचे सात गुन्हे त्याच्याविरुद्ध यापूर्वी नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभय सिंह देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0 टिप्पण्या