Ticker

6/recent/ticker-posts

शस्त्र विकणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक, तीन पिस्तुले, ४५ जिवंत काडतुसे जप्त

मुंबई, दादासाहेब येंधे : इतर राज्यांतून येऊन बेकायदेशीररित्या विदेशी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे विकण्यासाठी मुंबईत आलेल्या तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने केली असून, आरोपींकडून तीन पिस्तुले व मॅगझीनसह ४५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

काहीजण विनापरवाना पिस्तुलांची विक्री करण्यासाठी शुक्रवारी रात्री अंदाजे १० वाजण्याच्या सुमारास फोर्ट येथे सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ, पी. डीमेलो रोड परिसरात, सार्वजनिक शौचालयाजवळ, ईस्टर्न फ्रीवेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.


ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या झडतीदरम्यान ३ विदेशी बनावटीची पिस्तुले, मॅगझीनसह ४५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या