मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई गुन्हे शाखेने ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप द्वारे नागरिकांना भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सर्व आरोपींना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पीडित व्यक्तीने गेल्या वर्षी २५ मे रोजी एका ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपवरून २२,०५०/- रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेण्याच्या वेळी आरोपींनी पीडित व्यक्तीला एक 'एपीके' फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले होते. या फाईलच्या माध्यमातून आरोपींनी पीडित व्यक्तीच्या मोबाइल फोनचा संपूर्ण ॲक्सेस मिळवला आणि त्याच्याकडील सर्व डेटाचा ताबा घेतला. दरम्यान, पीडित व्यक्तीने व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली, मात्र तरीही आरोपींनी पीडित व्यक्तीचा छळ करणे थांबवले नाही. आरोपींनी पीडित व्यक्तीला, त्याच्या नातेवाईकांना आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी सतत फोन करण्यास सुरुवात केली.
तसेच गंभीर बाब म्हणजे आरोपींनी पीडित व्यक्तीला धमकी दिली की, जर त्याला या सततच्या फोन कॉल्सपासून सुटका हवी असेल आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा हवी असेल असेल, तर तक्रारदार व्यक्तीला आरोपींनी सुचवलेल्या इतर ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपवरून पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागेल आणि त्यावरील व्याजही फेडावे लागेल. भीती, दबाव आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या धास्तीने ग्रासलेल्या तक्रारदाराला अखेर १८ वेगवेगळ्या ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवरून एकूण ७ लाख ०५,५७० रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले. तक्रारदाराने ही रक्कमही व्याजासह परत केली. मात्र तरीही धमक्यांचे फोन आणि मेसेज येणे थांबले नाहीत. आरोपींनी पीडित व्यक्तीला सांगितले की, जर त्याला या संपूर्ण जाचामधून कायमची सुटका हवी असेल, तर त्याला आणखी पैसे द्यावे लागतील.
आरोपींनी पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना सतत फोन आणि मेसेज पाठवून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. सततचा मानसिक त्रासामुळे व्यथित झालेल्या पीडित व्यक्तीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि २५ मे रोजी तक्रारदार व्यक्तीकडून खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या सहा आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. ऑनलाईन ॲपद्वारे नागरिकांना लोन घेण्यास भाग पाडून फसवणूक करणारी टोळीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

0 टिप्पण्या