Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत पावणेचार कोटींचे चरस जप्त; एका तस्कराला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने पावणेचार कोटींचे चरस जप्त केले असून पोलिसांनी एका तस्कराला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ३ किलो आणि ८८६ ग्रॅम चरस जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याचे मूल्य सुमारे ३.८८ कोटी (₹३८,८६०,०००) इतके असल्याचा अंदाज आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईत अंमली पदार्थांची खरेदी, विक्री आणि पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर सतत पाळत ठेवून होते. याचदरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे, अंमली पदार्थ विरोधी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या परिसरावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान टिळक नगर येथील 'रेल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' च्या गेटवर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आली. साक्षीदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली. या झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात चरस जप्त करण्यात आले. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि टिळक नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम ८(c) आणि २०(c) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यामागील पुरवठा साखळीदार कोण आहेत आणि या तस्करीमध्ये सहभागी कोणकोण आहेत याचा शोध अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या