मुंबई, दि. २१ : मुंबईत पिता-पुत्रावर जीवघेणा चाकू हल्ला करून फरार झालेल्या दोन हल्लेखोरांना ठाण्यातील घोडबंदर रोड येथील जंगलातून कुर्ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या तांत्रिक तपासानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगेश पाटील उर्फ शेरू (३०) व मनीष साहू उर्फ चिंटू (२४) अशी आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुर्ला, विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ मे रोजी आरोपी व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्रांवर चॉपरने हल्ला केला होता. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. तर मंगेश, मनीष फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचे लोकेशन शोधून काढले असता, ते दोघेजण घोडबंदर रोड, वाघबीळ परिसरात डोंगरीपाडा जंगलात लपल्याची माहिती समोर आली. पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने दोनही आरोपींना अटक केली. हे दोन्हीही आरोपी एका साथीदाराच्या सतत संपर्कात होते. त्याआधारे आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा