मनपाच्या तीन तोतया अधिकाऱ्यांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १७ जून, २०२३

मनपाच्या तीन तोतया अधिकाऱ्यांना अटक

 दुकानदार व डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न


मुंबई, दि. १७ : शहरातील नामांकित डॉक्टरसह विविध शॉप मालकांना त्यांच्या शॉपसह हॉस्पिटल बाहेर लावलेल्या नामफलकावरून कारवाई करण्याची धमकी देत ऑनलाईन पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून या तिघांनी महानगरपालिकेचे अधिकारी असल्याचे बतावणी करून आतापर्यंत काही डॉक्टरसह शॉप मालकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


विवेक विश्वास सदरे, अविनाश विनोद अरोरा आणि राहुल कैलास जठार अशी या तिघांची नावे असून तिघां विरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गटातील मुख्य सूत्रधार ॲक्टर असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी याबाबत सांगितले. 


जून महिन्यात खार आणि वांद्रे पोलीस ठाण्यात तोतयागिरी करून फसवणुकीसह आयटी कलम अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यातील तक्रारदार शहरातील नामांकित डॉक्टर तसेच शॉप मालक आहेत. या शॉप व हॉस्पिटलच्या बाहेर त्यांनी नाम फलक लावले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी फोन करून ते महानगरपालिकेतील अधिकारी असल्याचे सांगून नामफलकाबाबत त्यांना कारवाईची धमकी दिली होती. कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करून ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या गुन्ह्यांची विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास वांद्रे युनिटकडे सोपवला होता. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने विवेक, अविनाश आणि राहुल या तिघांना अटक केली. चौकशीत त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. यात त्यांना नीरजकुमार याने मदत केली होती.


Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज