चार तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. परीक्षा देण्यासाठी चाललेल्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आले. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई लोकलच्या महिला डब्यात एका २० वर्षीय तरुणीवर ४० वर्षीय प्रौढाने बुधवारी सकाळी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी एकटीने प्रवास करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. या घटनेच्या ४ तासांनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास
मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. ती परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. बुधवारी सकाळी ती सीएसएमटी येथील हार्बर लाईन लोकल ट्रेनमध्ये चढली. लोकल सुरु झाल्यानंतर ती असलेल्या महिलांच्या डब्यात एक व्यक्ती चढला. लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो मस्जिद स्टेशनवर खाली उतरला आणि पळून गेला. त्याने सकाळी ७:२६ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी आणि मशीद स्थानकांदरम्यान लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडीत तरुणीने केला आहे.
मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणी लोकलमधून उतरली आणि तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि चार तासांत आरोपीला शोधून त्याला अटक केली. रेल्वे पोलीस , गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मशीद स्थानकाच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर त्याची ओळख पटली आणि दुपारी ४ वाजता त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीचे नाव नवाज करीम असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत रात्री आणि पहाटेच्यावेळी लोकलमध्ये पोलीस तैनात करण्यात येतात. मात्र, हार्बर मार्गावर घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या डब्यात एक पोलीस कर्मचारी तैनात असतो. मात्र, ही घटना घडली, तेव्हा पोलीस कर्मचारी डब्यात नव्हता. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला आणि पीडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी परीक्षेसाठी जात होती. तिच्यावर अत्याचार करताना आरोपीने या तरुणीला मारहाणही केली. मात्र, मस्जिदला ट्रेन येताच तरुणीने आरोपीला जोरदार धक्का दिला आणि तिथून पळ काढला. पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा