राजस्थानमधून तिघे अटकेत
मुंबई, दादासाहेब येंधे : सायन अपहरण आणि अडीच कोटींच्या लूट प्रकरणात सायन पोलिसांनी राजस्थानमधून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारदाराच्या भाच्यानेच ही टीप दिल्याचे तपासात समोर आले आहे.
सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हिहर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली आहे. मूळचे राजस्थानचे असलेल्या तक्रारदार हरिराम घोटीया (वय, ३१) यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. घोटीया गेल्या आठवड्यात खाजगी बसने मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी व भाचा प्रशांत चौधरी होता. तेलंगणा येथील व्यापारी असलेले त्यांचे मालक संतोष नरेडी यांच्या मालकीचा सोने हिऱ्यांचा माल बीकेसी येथे पोचवण्यासाठी ते आले होते. घोटीया आणि त्यांचे सहकारी मुंबईत उतरताच आरोपींनी दिल्ली क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून त्यांना ताब्यात घेतले. या लुटारूंनी त्यांच्याकडील एकूण दोन कोटी ६२ लाख किमतीचा ऐवज काढून घेऊन तेथून पळ काढला होता.
याप्रकरणी सायन पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले. पथकाने घोटीया आणि त्यांचा सहकारी चौधरीकडे चौकशी सुरू केली. तेव्हा चौधरी बाबत संशय वाढल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच याबाबत टीप दिल्याची माहिती समोर आली. त्याच्या चौकशीतून राजस्थान कनेक्शन समोर येताच पथक राजस्थानला रवाना झाले. त्यांनी महिंद्र जाट (वय, २३) मनोज कुमार जैत सिंग (वय, ३३) यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ७३ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा