गुन्हे शाखेची उत्तम कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांना बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे. बेपत्ता झालेल्या पाच वर्षांच्या मुलीचा मुंबई गुन्हे शाखेने ३६ तासात शोध घेतला. बुधवारी हरवलेल्या मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. मनोरुग्ण असलेला आईसोबत घराबाहेर पडल्यानंतर मुलगी बेपत्ता झाली होती. हरवलेली मुलगी माटुंगा येथील बालसुधारगृहात सापडली. तेथून पोलिसांनी तिला तिच्या घरी पोहोचवले. मुलीचे वडील गुजरात मधील राजकोट येथील रुग्णालयात सध्या कर्करोगाचे उपचार घेत आहेत.
मुलीची आई घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी तिच्या मुलीसह तिच्या भावाच्या घरातून चेंबूर मधून निघून गेली. राहत असलेल्या घरात पोहोचल्यावर महिलेला मुलगी हरवल्याचे समजले. तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मानखुर्द पोलीस स्टेशन गाठून गुन्हा नोंदवला.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने देखील तपास सुरू केला. कुटुंबाकडे मुलीचा ती लहान असतानाचा जुना फोटो होता. परिणामी, नवीन फोटो नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडचणीचा सामना करावा लागला. पोलिसांनी बाल संगोपन संस्थांकडे तपासणी केली असता अशाच वर्णन असलेली एक मुलगी एका बालसंगोपन केंद्रात दाखल झाल्याचे समजले. त्वरित पोलिसांनी मुलीला शोधून काढले आणि तिच्या आईला व मामाला व्हिडिओ कॉल केला असता त्यांनी मुलीला ओळखले. बुधवारी या मुलीची व तिच्या कुटुंबीयांची पोलिसांनी भेट घालून दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा