दलाल महिलेला अटक, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या दीड दिवसाच्या मुलीला अवघ्या एक लाखात विकण्याचा मुलीची आई व दलाल महिलेचा डाव मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. दलाल महिलेस पकडून चिमुकलीला तिच्या आईसह सायन रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीची विक्री करायचे ठरले नसते तर तिला फेकून देण्याचा तिच्या आईचा मनसुबा होता असे तपासात उघड झाले आहे.
ज्योती मोगम (वय,३७) ही महिला एका दीड दिवसाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या पथकाला मिळाली त्यानुसार प्रभारी निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ननावरे, एपीआय सचिन गावडे, मीरा देशमुख, उपनिरीक्षक मुठे, रहाणे, सावंत, आव्हाड, देसाई, तुपे, शिंदे, वानखेडे, मोरे, आराख, माळवेकर, चव्हाण, पवार, शेख, अभंग, सरोदे, पाटील व पथकाने त्या चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळून लावण्याचे ठरवले. त्यानुसार पोलीस पथकातीलच अधिकारी व कर्मचारी बनावट ग्राहक बनले व त्यांनी ज्योतीला संपर्क साधून त्या चिमुकलीला विकत घ्यायची तयारी दाखवली. त्यानुसार ज्योतीला मुलीला घेऊन चेंबूरच्या दादासाहेब गायकवाड नगर परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे ज्योती तिथे मुलीला घेऊन येताच पोलीस पथकाने तिला रंगेहात पकडले.
तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याच ओळखीच्या पूजा नावाच्या महिलेची ती मुलगी असल्याचे तिने सांगितले. अनैतिक संबंधातून तिला ही मुलगी झाल्याने तिला ती नको होती. दीड दिवसांच्या त्या चिमुकलीला फेकून देण्याचा पूजाचा मनसुबा होता. पण, पूजा आणि ज्योतीने मुलीला अवघ्या एक लाखात विकायचे ठरवले. मात्र, दोघींचा हा डाव पोलिसांनी उधळून लावला. पूजाचा पती गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. पूजा आणि ज्योती एकाच परिसरात राहणाऱ्या असल्याने पूजाने अनैतिक संबंधातून एका मुलीला जन्म दिल्याचे ज्योतीला ठाऊक होते. त्यामुळे मुलीला फेकण्याऐवजी विकायचा प्लॅन त्यांनी रचला होता.

0 टिप्पण्या