बनावट नोटा चलनात आणायच्या होत्या
मुंबई : कर्नाटकातील एक टोळी भारतीय चलनाच्या शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते. पण, दादर पोलिसांनी त्या टोळीच्या डाव उधळून लावला. चौघांना अटक करून पोलिसांनी शंभर रुपये दराच्या १६८ तर २०० रुपये दराच्या २६४ बनावट नोटा जप्त केल्या. तसेच नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
दादर पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना परळ एसटी डेपोच्या समोरच्या भागात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आनंदकुमार ममदापूर (वय,२९) या तरुणाला पकडले. गुलबर्गा येथील रहिवासी असलेल्या ममदापूरकडे १०० रुपये दराच्या १२ बनावट नोटा मिळाल्या. त्याला अटक करून तो रहात असलेल्या ठिकाणी झडती घेतली असता १०० आणि २०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा सापडल्या.
ममदापूरकडे याबाबत चौकशी केली असता कर्नाटकच्या हुमनाबाद येथे राहणाऱ्या शिवकुमार शंकर याचे नाव पुढे आले. सदरच्या नोटा शंकरने दिल्याचे त्याने सांगताच पोलिसांनी शंकर आणि त्याचा अन्य सहकारी किरण कांबळे यांना पकडले. दोघांकडे २० हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्यानंतर काही बनावट नोटा मुंबईत राहणाऱ्या आकाश तडोलगी याला दिल्या असल्याचे शंकरने चौकशी सांगितल्यानंतर पोलिसांनी आकाशला पकडले. दहिसर येथे राहणाऱ्या आकाशकडे तीन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या.
शंकर याने या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आकाश ममदापूर यांना दिल्या होत्या. तर कांबळे याने त्या नोटा छापून शंकरला दिल्या होत्या. अशाप्रकारे बनावट नोटा चलनात आणून अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्याचा या भमट्यांचा डाव उधळून लावत दादर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्याकडून एकूण ६८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.
0 टिप्पण्या