दिंडोशी फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निकाल
मुंबई : मुंबई शहर तसेच देश हादरवणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोपी मोहन चौहान याला अखेर दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीने केलेल्या अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. आरोपीच्या अटकेनंतर हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून वर्षभराच्या आत न्याय देण्यात राज्य सरकारला यश आले आहे.
साकीनाका येथे १० सप्टेंबर २०१९ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी घडलेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली होती. पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हा खटला जलद गतीने चालवण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात आला. दिंडोशी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सोमवारी मोहन चौहान याला हत्या आणि बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यावर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. नुकतीच दिंडोशी सत्र न्यायालयाने मोहन चौहान याला कोणतीही दयामाया न दाखवता केलेला गुन्हा अत्यंत क्रूर असून दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे स्पष्ट करत चौहान याला फाशीची शिक्षा सुनावली.
काय घडलं होतं त्या रात्री...
साकीनाका येथे खैरानी रोड वर पुठ्ठ्यची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०१९ च्या मध्यरात्री या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रूमला फोन करून एका बाईला मारहाण सुरू असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी १० मिनिटांच्या आत तेथे पोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत दिसली. तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान तिच्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्या महिलेचा दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला मृत्यू झाला होता.

0 टिप्पण्या