Ticker

6/recent/ticker-posts

बोगस नोटांची छपाई करणारी टोळी गजाआड

सात कोटी रूपयांच्या नोटांसह सात जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : बोगस नोटांची छपाई करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा कांदवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. दहिसर आणि अंधेरीतून पोलिसांनी विनोद विजयन, प्रदीप चौधरी, आफाक अहमद अंसर अहमद अन्सारी, मनोज शर्मा, सुमित शर्मा उर्फ सॅम, मोहम्मद वसीम बुंदु मुसलमानी, इसरार अहमद अब्दुल सलाम कुरेशी या सात जणांना अटक करून दोन हजार रुपयांच्या सात कोटी रुपयांच्या बोगस नोटांसह इतर साहित्य जप्त केले आहे. त्या नोटांची छपाई दिल्ली येथे झाली असून हवाला ऑपरेटरमार्फत वितरण होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सर्व आरोपी केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंडचे रहिवासी आहेत. त्यांना स्थानिक न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात बोगस नोटांची छपाई करणारी आंतरराज्य टोळी सक्रीय असून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी या बोगस नोटा वितरीत करण्याची योजना असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. पोलिसांनी यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.



दहिसर येथील पश्चिम दृतगती महामार्ग चेकनाका परिसरात काहीजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सचिन गवस, मानसिंग पाटील, भरत घोणे, विशाल पाटील, अजित कानगुडे, दीपक कांबळे, गिरीश सुर्वे, विक्रांत खांडेकर, सचिन खताते, जयेश केणी, महेश रावराणे, सोमनाथ कांगणे, जयश्री गोसावी, उपेंद्र मोरे यांनी दहिसर चेकनाक्यावर साध्या वेशात पाळत ठेवली होती. एका कारमधून आलेल्या चार संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


या चौघांकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात पोलिसांना पाच कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या २५ हजार बोगस नोटा सापडल्या. वसीम, मनोज, सुमित आणि विनोद या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशी त्यांचे काही सहकारी अंधेरीतील सर्व जवळील एस व्ही रोड च्या हॉटेल अस्फामध्ये राहत असल्याचे उघडकीस आले. त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून प्रदीप, आफाक, इसरार या तिघांना अटक केली, त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या दहा हजार नोटा जप्त केल्या. तसेच वेववेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आदी साहित्य जप्त केले. 













Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या