चोरी करून पळून गेलेल्यांना काही तासात अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : चोरीच्या उद्देशाने एका व्यापाऱ्याचा अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समतानगर पोलिसांनी अटक केली.
शैलेश कुमार तिवारी, विजयराज शुक्ला, प्रदीप मिश्रा आणि अजय मिश्रा असे त्या चौघांची नावे आहेत. त्यांना बोरवली न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा सध्या तपास सुरू आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत बोरवली परिसरात राहतात. त्यांचे अंधेरीत खाजगी कार्यालय आहे. गेल्या आठवड्यात ते नेहमीप्रमाणे त्यांच्या अंधेरीतील कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघाले. कांदिवलीतील समता नगर परिसरात जात असताना एका रिक्षाने त्यांच्या कारला जाणून-बुजून धडक दिली. यावेळी त्यांचा रिक्षाचालकाची वाद झाला. दरम्यान रिक्षातून इतर तीन जण बाहेर आले आणि त्यांनी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखवून त्यांनी आरडाओरड केल्यानंतर तिथे काही लोक जमा झाल्याने ते चौघेही पळू लागले. पळून जाणाऱ्या दोघांनाही स्थानिक लोकांनी पकडून समतानगर पोलिसांच्या स्वाधीन केले, तर दोन जण पळून गेले. या दोघांच्या चौकशीत इतर दोघांची नावे समजली. त्यानंतर पळून गेलेल्या दोघांनाही काही तासात पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराकडे दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती या चौघांना होती. ही रोकड लुटण्यासाठी त्यांनी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा