मुंबई, दादासाहेब येंधे : शहरात वयोवृद्धांना लक्ष करुन लुटणाऱ्या एका टोळीचा आग्रीपाडा पोलिसांनी पर्दाफाश करून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. रामलाल चुनीलाल राठोड उर्फ गबरा, धर्मा उर्फ बुचा गंगाराम सोळंखी आणि लक्ष्मण शामू देवरस अशी त्यांचे नाव आहेत. त्यांच्यावर मुंबईसह ठाणे दिल्लीत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिला ज्येष्ठ नागरिक असून ते आपल्या कुटुंबीयांसोबत भायखळा परिसरात राहतात. ०२ सप्टेंबरला त्याच परिसरात असणारे एका मंदिरात त्या जात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी त्यांना रस्त्यात थांबवून त्यांची आपुलकीने चौकशी केली. तसेच त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तिथून पळ काढला होता. आपल्याला लुबाडल्याचे लक्षात येताच त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी परिसरातील सत्तरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर या तिघांनी मुंबई ते ठाणे दरम्यान सहा टॅक्सी बदलून प्रवास केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन ठाण्यातील साठे नगर परिसरातील होते. हाच धागा पकडून पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून इंदिरा नगर येथून रामलालसह धर्मा आणि लक्ष्मण या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील लक्ष्मण हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून तो रिक्षा चालक म्हणून ठाण्यात काम करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा