मुंबई हायकोर्टाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा न घेता नव्या निकषांनुसार निकाल जाहीर केला होता. त्यानंतर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. सरकारचा हा अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच इयत्ता अकरावीचे प्रवेश द्यावेत, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या निकालावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
"न्यायालयाचा अभ्यास करून त्यानंतर अंतर्गत गुणांच्या निकालांच्या आधारावर प्रवेशक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच त्याचे नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणीही केली आहे, तर काही विद्यार्थ्यांनी अभ्यासही सुरू केला आहे. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाच्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यावेळीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येईल आणि प्रत्येकाला प्रवेश मिळेल", असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
राज्य सरकारनं येत्या ४८ तासांत निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असंही निर्देश कोर्टानं दिले आहेत.तसेच पुढील सहा आठवड्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा