भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेचा मफतलाल मिल च्या जागेवरील विस्तार करताना त्यातील काही भागात लहान मुले / जेष्ठ नागरिक यांना मनोरंजनासाठी मैदान तसेच येथील स्थानिक लोकांना छोटे मोठे कार्यक्रम घेणे तसेच बैठका यासाठी सामाजिक सभागृहाकरिता जागा राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी जीवनप्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली.
राणीबागलगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटरचा भूखंड असून, तो मफतलाल मिलला भाडेपट्ट्यावर देण्यात आला होता. या भाडेपट्टीचा कालावधी सन २०१७ मध्ये संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या भूखंडाचा निम्मा म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर (दहा एकर) भूभाग पालिकेला मिळाला आहे. राणीबाग विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने सुरू असताना तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मफतलाल मिलच्या जागेवरील विस्ताराचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यात ब्लॅक जग्वार, चित्ता, पांढरा सिंह यासह देश-विदेशातील नवे प्राणी आणि पक्ष्यांचे राणीबागेत आगमन होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत व या कामाच्या निविदा देखील पालिकेने मागवल्या आहेत. मात्र सदर बागेचा विकास करताना महापालिकेने स्थानिक नागरिकांना डावलले आहे. ह्या विस्तारामुळे तेथे राहत असलेल्या स्थानिक नागरीकांना कोणताही फायदा होणार नाही. या विभागातील नागरिकांना, लहान मुलांना खेळण्यासाठी एखादे मोठे मनोरंजन मैदान देखील येथे नाही. मग या जागेत महानरपालिका एखादे मनोरंजन मैदान का निर्माण करत नाही ? फक्त राणीच्या बागेचा विकास मग आजूबाजूच्या परीसराला थोड्या चांगल्या सूविधा दिल्या तर बिघडते कुठे ? घोडपदेव, नारळवाडी ते फेरबंदर हा जो मधला परीसर आहे त्यांना साधे छोटे मोठे कार्यक्रम / मिटींग करायला सुध्दा जागा नाही. त्यांना यासाठी काळाचौकी व माझगांव या ठिकाणी जावे लागते. आज त्या परीसरात वस्ती वाढत आहे. मात्र लोकांना चांगल्या सूविधा मिळणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे राणीच्या बागेचा मफतलाल मिल च्या जागेवरील विस्तार करताना त्यातील काही भागात लहान मुले / जेष्ठ नागरिक यांना मनोरंजनासाठी मैदान तसेच येथील स्थानिक लोकांना छोटे मोठे कार्यक्रम घेणे तसेच बैठका घेण्यासाठी सामाजिक सभागृहाकरिता राखीव जागा ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती जीवनप्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर याांनी दिली आहे.

0 टिप्पण्या