प्रभागनिहाय नेमलेल्या पथकांव्दारे स्वच्छता कार्याला गती देण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आदेश - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

प्रभागनिहाय नेमलेल्या पथकांव्दारे स्वच्छता कार्याला गती देण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आदेश

वाशी  व तुर्भे विभाग कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामांचा घेतला सविस्तर आढावा
           
            'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा निश्चय केला असताना त्यामध्ये घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे व महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये हा कचरा वेगवेगळा दिला जाणे आत्यंतिक महत्वाचे असून दररोज 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणा-या सोसायट्या, वसाहती आपल्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रीया प्रकल्प राबवित आहेत याकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिले.

        स्वच्छ सर्वेक्षण 2021 संबंधीत कामांचा विभाग कार्यालय निहाय आढावा घेण्यास आयुक्तांनी सुरुवात केली असून आज त्यांनी वाशी व तुर्भे विभाग कार्यालयामध्ये स्वच्छता विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला.
            प्रत्येक प्रभागासाठी विभाग कार्यालय पातळीवर अधिकारी, कर्मचारी यांची पथके नेमण्यात आली असून त्यांनी कचरा वर्गीकरण, संकलन व विल्हेवाट याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे व याबाबत नियमित जनजागृती करत रहावी असे आयुक्तांनी  सूचित केले.

            सोसायट्यांच्या बाहेर ओला, सुका व घरगुती घातक कच-यासाठी हिरव्या, निळ्या व लाल रंगाच्या कचरापेट्या असाव्यात. तसेच सोसायट्यांप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी भागातही घरांमध्येच कच-याचे वर्गीकरण केले जावे व  घराघरातून कचरा वेगवेगळा संकलीत करावा आणि याकरिता छोट्या गाड्या, वाढीव मनुष्यबळ उपयोगात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

                        गांवठाण व झोपडपट्टी भागात डायपर, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी, सेल, डासनाशक, रंगांचे डबे, स्वच्छता साहित्य अशा प्रकारचा घरगुती घातक कचरा योग्य प्रकारे संकलीत करण्यासाठी तेथे मध्यवर्ती ठिकाणांवर लाल रंगांच्या कचरापेट्या ठेवाव्यात व नागरिकांना त्याची व्यापक प्रमाणात माहिती द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

                        घराघरातून कचरा संकलीत झाला तर कचराकुंडीमुक्त शहर करता येईल हे लक्षात घेऊन त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करतानाच कचराकुंड्या काढून टाकल्यानंतर ती जागा सुशोभित करून त्याठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी सीसीटिव्ही अथवा प्रत्यक्ष व्यक्तींमार्फत लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

                        आपल्या घरातच खत टोपलीचा (कंपोस्ट बास्केट) वापर करून घरातील ओल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभागनिहाय नेमलेल्या पथकांमार्फत नागरिकांना प्रोत्साहीत करावे व त्यामध्ये सातत्य राखावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

                        सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यांच्या स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट करीत अधिकारी, कर्मचारी यांना शौचालये निश्चित करून देऊन त्यांनी या शौचालयांना नियमित भेटी द्याव्यात व तेथील स्वच्छतेबाबत तपासणी करुन त्यामधील त्रुटी संबंधितांकडून दूर करून घ्याव्यात अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

                        महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी शहरात विविध कामांसाठी फिरताना जागरूक राहून स्वच्छता व अनुषांगिक बाबींबाबत आपल्याला आढळणा-या सुधारणायोग्य गोष्टी संबंधितांच्या निदर्शनास आणुन द्याव्यात व त्या दूर कराव्यात असे आयुक्तांनी सांगितले.

        तलावांच्या पृष्ठभागावर जलपर्णी अथवा इतर कोणतीही वस्तू तरंगताना  दिसू नये याकरिता सकाळी लवकरच नियमितपणे तलावांची स्वच्छता  करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले.

        नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये म्हणून लावण्यात येत असलेल्या लोखंडी जाळ्या सर्व मुख्य रस्त्यांवरील नाल्यांवर लावाव्यात तसेच नाल्यांच्या प्रवाहातील कचरा अडविण्यासाठी स्क्रीन लावून हा कचरा नियमितपणे साफ करण्याकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

        शहरातील प्रत्येक दुकानदार तसेच फेरीवाले यांनी कच-याचा डबा ठेवणे गरजेचे असून तशा प्रकारच्या सूचना सर्व दुकानदार व फेरीवाल्यांना देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

        कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या प्रतिबंधीत असून प्लास्टिक पिशव्या मार्केटमध्ये दिसताच कामा नयेत याकरिता सातत्याने धडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
        सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना घेऊन फिरणा-या व्यक्तींनी शहर अस्वच्छ होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असून याबाबत निष्काळजीपणा करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

        8 फेब्रुवारीपासून विभागांसाठी नेमलेल्या नोडल अधिका-यांमार्फत पूर्व स्वच्छता सर्वेक्षण (Pre Swachha Survekshan) केले जाणार असून तत्पूर्वी  स्वच्छताविषयक बाबींमध्ये जाणवणारी  कमतरता दूर करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

        नवी मुंबई शहरामध्ये देशात प्रथम क्रमांक येण्याची क्षमता असून नागरिकांचे संपूर्ण सहकार्य लाभले तर हे अशक्य नाही. त्यामुळे आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरात निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घातक अशा तीन प्रकारे वेगवेगळा ठेवावा व महानगरपालिकेकडे देताना तो वेगवेगळा द्यावा तसेच 'माझा कचरा ही माझी जबाबदारी' हे लक्षात घेऊन आपल्या घरातील ओल्या कच-याचे कंपोस्ट बास्केट वापरून खतात रुपांतर करावे त्याचप्रमाणे दररोज 50 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, वसाहती यांनी आपल्या आवारातच कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.



























प्रेस नोट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज