कोव्हीड लसीकरण प्रक्रियेला नवी मुंबईत सुरूवात - आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
आजपासून कोव्हीड 19 लसीकरणाला देशात प्रारंभ होत असून ही आपल्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. 10 महिन्यांपेक्षा अधिक काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या कोव्हीड योध्यांनी जो संघर्ष केला तसेच लस शौधण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी अखंड परिश्रम करून योगदान दिले त्या सर्वांचे आपण आभारी आहोत असे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले. तथापि लस सापडली म्हणजे कोरोना संपला असा अतिआत्मविश्वास न बाळगता कोरोनाचा एकही रूग्ण नाही अशी स्थिती येईल तोपर्यंत मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे या कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक रूग्णालय वाशी, सार्वजनिक रूग्णालय ऐरोली, डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालय नेरूळ व अपोलो हॉस्पिटल बेलापूर या 4 रूग्णालयातील कोव्हीड लसीकरण केंद्रावर आज लसीकरण सुरू करण्यात आले.
लसीकरणाच्या आजच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड (सार्वजनिक रूग्णालय ऐरोली केंद्र), डॉ. विजय येवले, बालरोगतज्ज्ञ (सार्वजनिक रूग्णालय वाशी केंद्र), डॉ.आनंद सुडे, बालरोगतज्ज्ञ (डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालय नेरूळ केंद्र) व वेंकटराम व्ही. (अपोलो हॉस्पिटल बेलापूर केंद्र) या कोव्हीड योध्यांना पहिली लस देण्यात आली.
शासनाच्या कोविन ॲपवर नोंदीत व ज्यांना आज आपले लसीकरण या केंद्रावर आहे असा मोबाईलवर संदेश आला आहे अशा एका केंद्रावर एका दिवशी 100 व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 4 केंद्रांवर आजच्या पहिल्या दिवसात 400 वैद्यकीय कोव्हीड योध्यांचे लसीकरण होत आहे.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नेरूळ येथील डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालयातील कोव्हीड 19 लसीकरण केंद्राला डॉ.डि.वाय.पाटील समुहाचे प्रमुख श्री. विजय पाटील व अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या समवेत भेट देऊन लसीकरण कक्ष व प्रक्रियेची पाहणी केली. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे बेलापूर मधील अपोलो हॉस्पिटल येथील कोव्हीड 19 लसीकरण केंद्राचीही पाहणी केली. यावेळी अपोलो रूग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. किरण मराठे उपस्थित होते. या भेटीमध्ये आयुक्तांनी सर्व प्रक्रियेची बारकाईने पाहणी करून माहिती जाणून घेतली तसेच लसीकरण होण्यापूर्वी व लसीकरण झाल्यानंतर दिल्या जाणा-या सूचना त्याठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतल्या.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोव्हीड काळात आरोग्य विषयक सेवा देणा-या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांना लसीकरण केले जात आहे. अशा 19 हजार 85 कोव्हीड योध्यांची नोंद कोविन ॲपवर झालेली असून नवी मुंबई महानगरपालिकेस ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून 21 हजार कोव्हीशील्ड लस प्राप्त झालेल्या आहेत.
पहिल्या दिवशी शासन निर्देशानुसार 4 रूग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आलेली असली तरी 50 लसीकरण केंद्रांचे नियोजन महानगरपालिकेने केलेले असून त्याठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची निवड करून त्यांना सुयोग्य प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे अशी माहिती याप्रसंगी आयुक्तांनी दिली.
पहिल्या टप्प्यात आरोग्यकर्मींना कोव्हीड लसीकरण होत असून लसीकरणाचा मोबाईलवर संदेश आल्यानंतर त्या दिवशी दिलेल्या केंद्रावर लसीकरणाला जाताना त्या व्यक्तीसोबत आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत याची विशेष नोंद घेऊन लसीचा पुढील डोस कधी घ्यावयाचा याचही संदेश मोबाईलवरूनच प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
भारत सरकारने मान्यता दिलेली ही कोव्हीड लस सुरक्षित असून याबाबत कोणीही गैरसमज पसरवू नयेत व लोकांनीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सूचित करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या लसीकरणातून कोव्हीडपासून मुक्ती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र असे असले तरी जोपर्यंत कोव्हीड पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत दररोज मास्कचा वापर अनिवार्य आहे तसेच सुरक्षित अंतर राखणे व नियमित हात धुणे वा सॅनिटाझर वापरणे अतिशय गरजेचे असल्याचे सांगत कोव्हीडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा