कोव्हीड १९ लसीकरणाच्या रंगीत
तालमीचे सुव्यवस्थीत आयोजन
या रंगीत तालमीव्दारे लसीकरण प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला. यामध्ये नोंदणी कशाप्रकारे करणे, कोणती कागदपत्रे तपासणे, कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून त्यांची बैठक व्यवस्था करणे, लसीकरण कक्षातील व्यवस्था, निरीक्षण कक्षातील व्यवस्था अशी संपूर्ण प्रक्रिया हाताळती आली.
अशाप्रकारच्या ५० लसीकरण केंद्रांचे महानगरपालिकेमार्फत नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार दररोज १०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिली. आपली लोकसंख्या विचारात घेऊन लसीकरण प्रक्रिया किती कालावधीत करणे अपेक्षित आहे तसेच किती लस उपलब्ध होणार आहेत याचा तपशिल लक्षात घेऊन शासनाच्या मार्गदर्शनानुसार केंद्र संख्यांमध्ये वाढीबाबत नियोजन केले जाईल असे ते म्हणाले. सध्याच्या शासकीय सूचनांनुसार लसीकरणासाठी आवश्यक केंद्रांचे व तेथील अधिकारी, कर्मचारी यांचे नियोजन करण्यात आले असून आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. त्याचीच रंगीत तालीम आज घेण्यात आली.
यानंतर प्रत्येक स्तरावर बैठक होईल व त्याठिकाणी रंगीत तालमीतील अनुभवांवर सविस्तर चर्चा केली जाईल. यामध्ये जो काही अनुभव आला वा अडचणी आल्या याबद्दल शासनाकडून अपेक्षित आहे त्याठिकाणी मार्गदर्शन घेतले जाईल. याशिवाय अधिकारी, कर्मचारी यांना काही अडचणी जाणवत असल्यास त्याचेही निराकरण केले जाईल असेही आयुक्तांनी सांगितले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात महानगरपालिका व खाजगी वैद्यकीय सेवेतील कोव्हीड योध्द्यांना लसीकरण केले जाणार असून १७ हजारहून अधिक आरोग्याशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची नोंद शासनाच्या को-विन अॅपवर करण्यात आलेली आहे. त्यामधील २५ जणांचा आजच्या रंगीत तालमीमध्ये समावेश होता.
लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोविन अॅपवर नोंदणी होणे आवश्यक असून अशा व्यक्तीला लसीकरणाचा दिवस, स्थळ व वेळ याविषयीची माहिती त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर संदेशाव्दारे कळविली जाणार आहे तसेच लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. पुढच्या टप्प्यात पोलीस, स्वच्छताकर्मी असे कोव्हीड काळात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी तसेच त्यापुढील टप्प्यात ५० वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक व कोमॉर्बीड व्यक्ती यांना लसीकऱणाचे नियोजन असून लसीकरणामध्ये ज्या व्यक्तीची कोविन ॲपवर नोंदणी झालेली आहे त्याला मोबाईलवर संदेश आल्यानंतरच त्याचे लसीकरण केले जाणार आहे.
रंगीत तालिमीच्या पक्रियेची पाहणी करताना आयुक्तांनी व्हॅक्सीनेशन अधिकारी यांनी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी शासनाने दिलेल्या ओळख पत्रांपैकी एका ओळखपत्राची बारकाईने पडताळणी करावी असे सूचीत केले. प्रतिक्षा कक्षात सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करावी व आवश्यकतेनुसार प्रतिक्षा कक्षांची संख्या वाढवावी अशाही सूचना त्यांनी केल्या. 4 महत्वाचे संदेश असलेल्या फलकावर हेल्पलाईन नंबर देखील नमूद करावा तसेच सूचनांचे हस्तपत्रकही जाताना सोबत द्यावे असे ते म्हणाले. पर्यवेक्षण करणा-या अधिका-यांनी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांवर आदल्या दिवशीच जावून केंद्राची रचना व सुविधांची पाहणी करावी आणि कमी असलेल्या गोष्टींची पुर्तता करावी व प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी प्रभावी पर्यवेक्षण व निरीक्षण करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड १९ लसीकरणाच्या रंगीत तालमीव्दारे लसीकरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी केली असून महानगरपालिका लसीकरणासाठी सज्ज आहे असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा