मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशनच्या नव्या टेनीस कोर्टाचे उद्घाटन व लोकार्पण
मुंबई : दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या मुंबई स्कूल स्पोर्ट
असोसिएशन (एम.एस.एस.ए.) सारख्या संस्थांच्या पाठीशी शासन कायम असेल व त्यांना सर्वतोपरी
मदत करेल, असे क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी
सांगितले.
एम.एस.एस.ए. असोसिएशनच्या माध्यमातून तयार
करण्यात आलेल्या नव्या टेनीस कोर्टचे उद्घाटन व लोकार्पण क्रीडा राज्यमंत्री कु.
आदिती तटकरे यांच्या हस्ते आझाद मैदान येथे असलेल्या एम.एस.एस.ए .च्या आवारात
झाले.
राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, कोविड
काळात संचारबंदीमुळे मैदानी खेळ व खेळाडूंचा सराव तसेच स्पर्धाही बंद असल्याने
क्रीडा क्षेत्रावरही मोठा प्रभाव पडला. सध्या सर्व सुरळीत होत असतांना खेळाडूंना
नवी उमेद देणारे उपक्रम मुंबई स्कूल स्पोर्ट असोशिएशनच्या माध्यमातून होतांना दिसत
आहे. दर्जेदार खेळाडू घडावे यासाठी
एम.एस.एस.ए. ने नव्या 2 लॉन टेनीस कोर्टची
स्थापना केली आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांच्या खेळातील
भविष्याची वाटचाल जोमाने करता येणे शक्य होणार आहे, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी
सांगितले.
मुंबईतील सुमारे 500 शाळांच्या माध्यमातून जवळपास 2
लाख खेळाडूंचा सहभाग व खेळातील प्रवास या संस्थेच्या माध्यमातून घडत आहे.
ज्यामध्ये टेनीस, क्रिकेट, फूटबॉल,
बास्केटबॉल, हॉकी, ॲथलॅटीक,
चेस, बॉक्सिंग, जिमनॅस्टीक,
हॅण्डबॉल, कॅरम, मार्शल
आर्ट, स्कॅश, टेबल टेनिस, थ्रो-बॉल व व्हॉलीबॉल अशा सुमारे 20 खेळांचा समावेश आहे. ऑल इंडिया, आशियाई
स्पर्धा, ऑलिम्पिक अशा राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील
विविध स्पर्धासांठी खेळाडू या माध्यतातून तयार होत आहेत, अशी
माहिती मुंबई स्कूल स्पोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष फादर ज्यूड रोड्रीग्ज यांनी दिली.
खेळाडूंच्या आग्रहास्तव राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी हाती घेतले
रॅकेट
या
कार्यक्रमात टेनीस कोर्टाचे फीत कापून उद्घाटन क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे
यांनी केले. क्रीडा राज्यमंत्री यांनी ‘हे कोर्ट
आजपासून खेळाडूंसाठी खुले करण्यात आले आहे’, असे घोषीत करताच
उपस्थित खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी
क्रीडा राज्यमंत्री यांनी प्रत्यक्ष आमच्यासोबत टेनीस खेळण्यासाठी आग्रह केला.
खेळाडूचा उत्साह व आग्रहास्तव राज्यमंत्री कु. तटकरे यांनी टेनीस कोर्टाचा ताबा
घेतला.
क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संस्थेच्या
कार्यालयाची व आवाराची पाहणी केली. या असोसिएशनची स्थापना दारोबजी
जमशेदजी टाटा यांनी खेळावर नितांत प्रेम असणाऱ्या काही मुख्याध्यापकांच्या
सहकार्याने 1893 मध्ये केली होती, असे असोसिएशनचे अध्यक्ष फादर रोड्रीग्ज यांनी सांगितले. टाटा ॲथलॅटीक
शिल्ड (1893) ॲथलिक, हॅरीस शिल्ड (1896),
गाईल्स शिल्ड (1901) क्रिकेट ज्यामध्ये अंडर 14 मध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी व
पृथ्वी शॉ सारखे खेळाडू खेळलेले आहेत, जुनिअर अगा खान (1901)
हॉकी अशा अनेक स्पर्धांमधून खेळाडूंनी जिंकलेल्या अनेक ऐतिहासिक व
वर्तमान पारितोषिकांची पाहणी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी
केली व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे व खेळाडूंचे कौतुकही केले.
कार्यक्रमास अध्यक्ष फादर रोड्रीग्ज
यांच्यासमवेत असोसिएशनचे पदाधिकारी, टेनीस कोच
वसीम राजा उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा