मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात उधळले मराठी गझलरंग
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागासह इतर नामवंत साहित्यिकांचे कार्यक्रम आयोजन करून मराठी भाषेचा गोडवा जनमानसात प्रसारित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
'लाभलेअम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' अशा शब्दात मराठी भाषेची थोरवी सांगणा-या गझलसम्राट सुरेश भट यांनी मराठी गझलांची पताका फडकत ठेवली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत गझल क्षेत्रातील नामांकीत गझलकार ए.के.शेख, डॉ. कैलास गायकवाड आणि जनार्दन म्हात्रे यांच्या मराठी गझल सादरीकरणाचा 'गझलरंग' हा विशेष कार्यक्रम पंधरवड्यानिमित्त महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उपस्थित श्रोत्यांप्रमाणेच फेसबुक लाईव्हवरून कार्यक्रम पाहणा-या अनेक श्रोत्यांनी मराठी गझलला उत्कट दाद दिली.
"सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच आमच्या मना दे, हळुवार उठतात सुखदु:ख लहरी, तया जाणण्या तूच संवेदना दे" अशा निसर्गाच्या प्रार्थनेने गझलकार ए.के.शेख यांनी सुरूवात केलेली ही गझल मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
"भेटली ती अन् सुचवले विषय गझलांचे, बोलली मोघम बरसले विषय गझलांचे, भेट पहिली त्यातूनी पाऊस रिमझिमता, मग पुढे थोडे सरकले विषय गझलांचे" अशा हळुवार लयीत सुरूवात केलेल्या जनार्दन म्हात्रे यांनी गझलचे वेगवेगळे अंदाज सादर केले.
गझलच्या प्रत्येक शेरात गझलकार वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करीत असल्याने शेराशेरांमध्ये वेगळा अर्थ असलेली गझल 'कवितांची कविता' असल्याचे सांगत श्रोत्यांची मनोभूमिका तयार करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांनी "जी वीजेचा लोळ नाही, ती गझलची ओळ नाही" अशी दमदार सुरूवात करीत सूत्रसंचालन आणि स्व गझलांचे सादरीकरण करीत कार्यक्रम रंगवित नेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा