आता स्वच्छतेची जिंगल रूजविणार नवी मुंबईत पहिल्या नंबरचा निश्चय - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

आता स्वच्छतेची जिंगल रूजविणार नवी मुंबईत पहिल्या नंबरचा निश्चय

 आता स्वच्छतेची जिंगल रूजविणार नवी मुंबईत पहिल्या नंबरचा निश्चय

             'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' ला सामोरे जाताना दरवर्षीप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृतीस सुरुवात झालेली आहे. गतवर्षी स्वच्छ शहर म्हणून भारतात तिसरे मानांकन मिळवणाऱ्या नवी मुंबईने आता "निश्चय केला - नंबर पहिला" या घोषवाक्यासोबतच आपली विशेष स्वच्छता जिंगल तयार केलेली आहे. 

            दरवर्षी जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करणारे अभिनव संगीतमय गीत महापालिकेकडून तयार करण्यात येते. या सुरेल जिंगलला नेहमीच सुजाण व कलाप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असतो. अशा यावर्षीच्या स्वच्छता जिंगलचे लोकार्पण नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

            स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे व देशात पहिल्या नंबरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा निर्माण करणारे हे स्वच्छता गीत श्रीम. धनश्री देसाई यांनी लिहिले असून, संजय विवेक यांनी संगीतबध्द केलेले आहे. तसेच रोहित शास्त्री यांच्या स्वरांनी सजलेले आहे. हे स्वच्छतागीत कचरागाड्यांसह प्रचाररथ तसेच वाहनांवर वाजविले जाणार असून या गीताच्या माध्यमातून 'निश्चय केला - नंबर पहिला' ही भावना नागरिकांच्या मनात जागृत केली जाणार आहे.

            कोरोनासारख्या आपत्तीकाळात नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत धैर्याने या संकटाचा सामना केलेला आहे. नागरिकांच्या सक्रीय सहयोगामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेचा महाराष्ट्रातील 1 नंबर कायम राखून देशातील मानांकन नेहमीच उंचावत नेले आहे. म्हणूनच आता देशातील प्रथम क्रमांकाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकसहभाग वाढीकरिता या स्वच्छता गीताच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. 













प्रेस नोट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज