मालवणी पोलिसांची उत्कृष्ट कारवाई
मुंबई, दादासाहेब येंधे : मालवणी येथून एका वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला मालवणी
पोलिसांनी दिवस-रात्र अविरत तपास करून अवघ्या ४८ तासात अटक केली. सफाला नायक असे या आरोपी महिलेचे नाव असून तिच्या तावडीतून लहान
मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट कामामुळे ती लहान मुलगी पुन्हा आईजवळ परतली. विशेष म्हणजे हा भावनिक क्षण पाहताना पोलिसांनाही आनंदाश्रू आवरले नाहीत.
मालाड परिसरात घरकाम करुन राहणारी सफाला ही मूळची ओरिसाची आहे. नोकरी सुटल्याने मालवणी परिसरात राहणाऱ्या एका परिचित महिलेकडे ती गेली. काम नाही, राहायला जागा नाही. एक दिवस राहिला द्या. उद्या निघून जाईल,' अशी विनंती तिने त्या ओळखीच्या महिलेकडे केली. महिलेच्या पतीने नकार दिला. मात्र, माणुसकीच्या नात्याने त्या महिलेने तिला एक दिवस राहायला दिले. दुसऱ्या दिवशी या दाम्पत्याची एक वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना सफाला हिने तिला पळवून नेले. सफाला आणि मुलगी कुठेही दिसत नसल्याचे पाहून घाबरलेल्या मुलीच्या आईवडिलांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
लहान मुलीचे अपहरण झाल्याचे ऐकताच पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत आणि पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी वरिष्ठ निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अर्जुन रजाने, महिला उपनिरीक्षक खोसे यांची पथके तयार केली. या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीवरून सफाला या महिलेस ठाण्याच्या हिरानंदानी परिसरातून अटक केली व लहान मुलीला पुन्हा तिच्या आईकडे सुपूर्द केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा