महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आवाहन
16 जानेवारीपासून देशभरात सुरु झालेल्या कोव्हीड 19 लसीकरण मोहिमेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही 4 केंद्रांवर सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 313 व दुस-या दिवशी 237 आरोग्यकर्मींनी लसीकरण करून घेत चांगली सुरुवात केलेली आहे. चारही केंद्रांवर पहिली लस घेणा-या डॉक्टरांनी लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाचा निरीक्षण कालावधी झाल्यानंतर लगेच आपल्या नियमित कामकाजाला सुरुवात केली व दिवसभर त्याच क्षमतेने काम केले. त्यामुळे ही लस अत्यंत सुरक्षित असून शासकीय पोर्टलवर नोंदणी केलेल्या व लसीकरणाच्या तारीख व वेळेचा संदेश प्राप्त झालेल्या प्रत्येकाने कोव्हीड 19 लस घेऊन स्वत:ला संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
शासन निर्देशानुसार कोव्हीड 19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस व इतर आरोग्यकर्मींना लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्या आरोग्यकर्मींचा अनुभव लक्षात घेतला तर काही तुरळक लोकांना सर्वसाधारणपणे कोणत्याही लसीकरणानंतर जसे काहीसा ताप आल्यासारखे वाटते तसे वाटले. मात्र हे प्रमाण लसीकरण झालेल्या संख्येच्या तुलनेत अत्यंत मर्यादित होते. कोणत्याही लसीकरण केलेल्या व्यक्तीला गंभीक लक्षणे आढळली नाहीत.
शासनाने लसीकरण सुरु करण्यापूर्वी विविध टप्प्यांवर लसीच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण खात्री केल्यानंतरच लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात कोव्हीडशी लढा देणारे आरोग्यकर्मी पहिल्या टप्प्यात लस घेत आहेत. लसीकरण सुरु केलेला भारत हा एकमेव देश नाही तर संपूर्ण जगभरात लसीकरण सुरु आहे. त्यामुळे मनात कोणतीही भिती न बाळगता व कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपले लसीकरण असेल तेव्हा लस घ्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेसाठी प्रथमत: शासकीय पोर्टलवर नोंदणी केली जाईल. त्यानंतर लसीकरणाच्या दिवस व स्थळाची माहिती असणारा मोबाईल संदेश पाठविला जाईल. त्या दिवशी योग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण देशात जून, जुलै, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या आज जरी कमी झालेली दिसली तरी युरोपातील अनेक देशांमध्ये कोव्हीडचा नवीन स्ट्रेन आढळल्याचे दिसून येत आहे. तेथील कोव्हीड बाधितांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे आज जरी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी ही परिस्थिती कशी राहील हे ठामपणे सांगणे शक्य नाही. या परिस्थितीत कोव्हीड 19 लसीकरण सुरु झाले हा फार मोठा दिलासा असून हे लसीकरण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकसंख्येला दिले गेले तर भविष्यात उद्भवणा-या अनेक समस्या टाळता येतील. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
कोव्हीड लसीकरणाविषयक सूचनांमध्ये 18 वर्षावरील व्यक्तींसाठी ही पूर्णत: सुरक्षित लस असून गरोदर माता व स्तनदा माता यांनी लस घेऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरणापूर्वी सद्यस्थितीत आपण कोणती औषधे घेत आहोत याचीही माहिती लसीकरण केंद्रावरील उपस्थित डॉक्टरांना सांगावी अशाही सूचना आहेत. 4 आठवड्याच्या टप्प्यात दोन वेळा लसी घ्यावयाच्या असून त्यामुळे शरीरात ॲन्टीबॉडीज तयार होणार आहेत व कोव्हीड 19 विषाणूपासून सुरक्षा मिळणार आहे. त्यामुळे कोव्हीड पासून सुरक्षा मिळण्यासाठी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा