Ticker

6/recent/ticker-posts

दोन हजारांपासून लाखापर्यंत सीडीआर, लोकेशनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई, दादासाहेब येंधे : केवळ दोन हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत मोबाइलचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), ग्राहकांची माहिती (एसडीआर), मोबाइल लोकेशन व आयएमईआय क्रमांकांची माहिती बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकाराचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बिहार आणि झारखंड पोलिस दलातील दोन पोलिसांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांपासून हे रॅकेट सुरू होते. याप्रकरणी दोन पोलिसांसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, एका मुंबईतील व्यापाऱ्याचीही चौकशी सुरू आहे.


मुंबईत ओशिवरा येथे राहणारा हंजला मुबारक सय्यद हा इन्स्टाग्रामवर चोरीला गेलेले, हरवलेले मोबाइल शोधून देण्याची जाहिरात करत होता. तो स्वतःला ‘इन्स्पेक्टर संजय’ असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करत असे. मोबाइल शोधून देण्याच्या मोबदल्यात पैसे घेऊन तो आपल्या संपर्कातील व्यक्तींकडून संबंधित मोबाइल क्रमांकांचे सीडीआर, एसडीआर आणि लोकेशन मिळवत होता. मात्र, तो कोणत्याही शासकीय पदावर कामावर नव्हता.

५५० हून अधिक मोबाइल लोकेशनची माहिती तपासात आतापर्यंत ५० सीडीआर, ५२० हून अधिक एसडीआर, ५५० हून अधिक मोबाइल क्रमांकांचे लोकेशन आणि ४२० हून अधिक आयएमईआय क्रमांकांची माहिती पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. मागणीनुसार दोन ते चार हजार रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत व्यवहार होत होते. टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि पबजी खेळताना आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी हे जाळे विस्तारले. मोबाइल क्रमांकांशी संबंधित गोपनीय माहिती कोणाला आणि कोणत्या कारणासाठी पुरविण्यात आली, तसेच तिचा अन्य गुन्ह्यांसाठी वापर झाला आहे का, याचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या