काळाचौकी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रात्री गस्तीदरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नुकतीच अटक केली. आरोपीकडून परवान्याविना बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरिफ मोहम्मद अस्लम शेख (वय, ३२) असून तो वांद्रे पश्चिम येथील रिक्लेमेशन रोडवरील जे.जे. कॉलनीचा रहिवासी आहे. सदर कारवाई २७ जुलै २०२६ रोजी उशिरा रात्री रे रोड येथील श्रीकांत रेड्डी रोडवरील बीएमसीच्या 'ई' विभाग कार्यालयासमोरील ठाकूर गोदाम परिसरात करण्यात आली. रोजच्या गस्तीदरम्यान पोलिसांना दहा जणांचा समूह हुक्का सेवन करताना आढळला. महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार हुक्का सेवनास बंदी असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सर्वांची झडती घेतली.
झडतीदरम्यान आरिफ शेख याच्याकडून ७.६५ मिमी भारतीय बनावटीचे पिस्तूल तसेच सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडील सॅमसंग व वनप्लस कंपनीचे दोन मोबाईल फोन आणि आधार कार्डही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात आरिफ शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध वांद्रे व विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचे आठ गुन्हे, तसेच वांद्रे पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला दोन वेळा मुंबई शहरातून तडीपार करण्यात आले होते. काळाचौकी पोलिसांनी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(अ) व १३५ अन्वये गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ दाखल केला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य नऊ जणांविरुद्ध सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट, २००३ अंतर्गत कलम ४ व २१ नुसार हुक्का सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
सदर उत्कृष्ट कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.

0 टिप्पण्या