लोहमार्ग पोलिसांची पंढरपूरमध्ये कारवाई
ठाणे (दादासाहेब येंधे): मेल, एक्सप्रेसमधील प्रवाशांचा मुद्देमाल पळवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पंढरपूरमध्ये केली. या कारवाईमुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या ३ गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमल जप्त केला आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरात राहणारे दत्ताराम शेलार (४८) हे नातेवाईकासह कोकणात गावी जात होते. त्यांनी दादर स्थानकातील फलाट क्र. ५ वरील कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये बसले. प्रवासादरम्यान त्यांनी दागिने असलेला बॉक्स पत्नीच्या हॅण्ड बॅगमध्ये ठेवला. दिवा स्थानक येण्यापूर्वी दागिन्याचा बॉक्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.
अशाच प्रकारे आणखी काही प्रवाशांचा मुद्देमल चोरीला गेला होता. या सर्व गुन्ह्यांचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिल्या. त्यानुसार भायखळा गुन्हे शाखेचे विशेष कृतीदल आरोपीचा शोध घेऊ लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना पोलिसांना आरोपीची माहिती प्राप्त झाली. पोलीस पथक पंढरपूरला रवाना झाले. येथील करकंब गावात सापाळा लावून दत्तू पवार (३९) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कब्बुली दिली. तसेच अन्य दोन प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त केले आहेत.
सदर कारवाई मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमराज साठे, पोउपनि दीपक शिंदे, सपोउपनि महेश कदम, हवालदार मयेकर, घार्गे, नलगे, दरेकर, कुंभार, फडके, पोना पाटील, थोरात, महागावकर, दिघे, पाटील, अंमलदार भराडे यांनी केली.


0 टिप्पण्या