Ticker

6/recent/ticker-posts

आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून तरुणींची करायचा फसवणूक

 साकीनाका पोलिसांची कारवाई


मुंबई : लग्न जुळणाऱ्या साइटवर तरुणींना आयपीएस असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या ठगाला साकीनाका पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अभिजीत गाढवे असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.


अंधेरीचा रहिवासी असलेल्या अभिजीतने लग्न जुळणाऱ्या साईटवर नाव नोंदवले होते. त्याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. एप्रिल महिन्यात त्याला एका तरुणीची रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर अभिजीत त्या तरुणीला भेटला. त्याने आपण आयपीएस अधिकारी असून आपली ओळख उघड होऊ नये म्हणून साध्या वेशात काम करतो अशा भूलथापा मारल्या. त्याचे वडील लष्करातून निवृत्त झाले असून गावी स्ट्रॉबेरीची बाग असल्याचे भासवले. तसेच आपली विमानतळावर ओळख असल्याचे सांगून त्याने तरुणीकडून ७३ हजार रुपये घेतले व तिला बनावट नियुक्तीपत्र दिले.


नियुक्ती पत्राबाबत तरुणीने तिच्या मित्राकडे विचारणा केली असता, सदर प्रकार समोर आला. फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने साकीनाका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद केला. परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, कोकणे, पाटील, खैरमोडे, भुवड, बंगाळे, जाधव यांनी तपास सुरू केला. फसवणूक करणाऱ्या अभिजीतची  माहिती मिळवून त्यावरून पोलिसांनी अभिजीतला ताब्यात घेऊन अटक केली.


'युट्युब' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या मालिका पाहून गेल्या वर्षभरापासून अभिजीत फसवणूक करत होता. फसवणूक केल्यानंतर त्याच्या घरचा तो खोटा पत्ता द्यायचा. फसवणुकीच्या आलेल्या पैशातून तो महागडे कपडे आणि मौजमजा करत होता. अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या