मुंबई : पॉक्सो अथवा विनयभंगाची तक्रार आल्यानंतर काय करावे याबाबत माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दोन आदेश जारी केले होते. ते दोन्ही आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आज रद्द केले. पोक्सो अथवा विनयभंगाची तक्रार आल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा नवा आदेश त्यांनी जारी केला आहे.
जुने भांडण, प्रॉपर्टीचा वाद, पैशांची देवाणघेवाण अथवा वैयक्तिक कारणातून बऱ्याचदा विनयभंग किंवा पोक्सोची तक्रार करण्यात येते. त्यामुळे अशावेळी उपायुक्तांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करावा असा पहिला आदेश संजय पांडे यांनी काढला होता. त्यानंतर विविध स्तरांतून या आदेशाला विरोध झाला होता. त्यानंतर पांडे यांनी आपल्या आदेशात बदल करून सुधारित आदेश जारी केला होता. विनयभंग किंवा पोक्सोच्या तक्रारी आल्यास ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने विभागीय सहाय्यक आयुक्त व परीमंडळीय उपायुक्तांची संपर्क साधून शहानिशा करावी व गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश घ्यावेत. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याची ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद करावी असे सुधारित आदेशात नमूद केले होते.
एसीपी अथवा उपायुक्तांनी आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे पालन करावे. नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यापूर्वी विभागीय सहाय्यक आयुक्तांचे योग्य आदेश घ्यावेत आणि उपायुक्तांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करावी असेही आदेशात म्हटले आहे. मात्र, नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पांडे यांचे दोन्ही आदेश रद्द केले आहेत. पोक्सो किंवा विनयभंग याबाबत कोणतीही तक्रार आल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे नव्या आदेशातून सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या