Ticker

6/recent/ticker-posts

लहान थोरांच्या लाडक्या 'सांताक्लॉज'चे यंदा वृक्षरुपातही आगमन

पर्यावरण जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व गोदरेज कंपनीचा अभिनव उपक्रम

वांद्रे पश्चिम परिसरात पर्यावरण पूरक सांताक्लॉजचे जल्लोषात स्वागत

मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील संगीत सम्राट नौशाद अली मार्गावर (कार्टर रोड) असणाऱ्या एका वृक्षावर लहान थोरांची लाडकी असणारी सांताक्लॉजची लाल-लाल रंगाची गोंडेदार, पण भव्य-दिव्य टोपी अवतीर्ण झाली आहे. येत्या ख्रिसमसच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने व गोदरेज कंपनीच्या पुढाकाराने हा पर्यावरण विषयक जनजागृती साधणारा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.


अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका श्रीमती तान्या दुभाष आणि मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, 'एच पश्चिम' विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.


आपल्याला लाखो लिटर ऑक्सिजन अर्थात प्राणवायू दररोज उपलब्ध करून देणारी झाडे आणि वृक्षवल्ली; हे देखील आपले सांताक्लॉज असल्याचे प्रतिकात्मकरित्या सांगत पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने "एच पश्चिम" विभागातील (वांद्रे पश्चिम) संगीत सम्राट नौशाद अली मार्गालगत (कार्टर रोड) व 'कॉफी बाय दी बेल्ला' च्या समोर असणा-या एका वृक्षावर प्रातिनिधिक स्वरूपात सांताक्लॉजची टोपी विराजमान झाली आहे. हा अभिनव सांताक्लॉज बघण्यासाठी आणि त्याच्या सोबत 'सेल्फी' काढण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहेत, अशी माहिती या निमित्ताने महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

















(जसंवि / ४८४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या