कफ परेड येथील धक्कादायक घटना
मुंबई, दादासाहेब येंधे : मुलगी होऊन तीन महिने झाले, मला साडी, पैसे आणि नारळ असे बक्षीस म्हणून द्या, अशी मागणी केली असता पालकांनी देण्यास नकार देऊन अपशब्द वापरले. यामुळे चिडलेल्या एका तृतीयपंथीयाने तरुणाला हाताशी धरून रात्रीच्या वेळेस झोपेत असलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचे तिच्या घरातून अपहरण केले आणि तिला खाडीत टाकून ठार मारल्याची संतापजनक घटना कफ परेड येथे घडली.
या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेऊन दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. कफ परेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलवाडीत सचिन हे त्यांची पत्नी व आई-वडिलांसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांची मुलगी होती. ८ जुलै २०२१ रोजी रात्री सचिन व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी मोठ्या शिताफीने त्या चिमुकलीचे घरातून अपहरण केले.
काही वेळानंतर मुलगी जवळ नसल्याचे लक्षात येताच सचिन यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. पण, ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे सचिन यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. दरम्यान मुलीचा सर्वत्र शोध सुरू असताना तेथे असलेल्या समुद्राच्या खाडीत त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आणि या घटनेने कफ परेड परिसरात एकच खळबळ उडाली.
वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पुढील तपास सुरू केला असता त्याच परिसरात राहणारा कन्हैया चौगुले (२४) हा तृतीयपंथी मुलगी झाली या निमित्ताने मला साडी, नारळ आणि पैसे द्या अशी मागणी करत होता. पण, आम्ही त्याला ते देण्यास नकार दिला होता. तेव्हा आमच्यात थोडी बाचाबाची झाली होती. असे मुलीच्या पालकांनी सांगतात हाच दोरा पकडून पोलिसांनी कन्हैया चौगुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे(२०) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्हा घडल्यापासून बारा तासांच्या आत पोलिसांनी तीन महिन्यांच्या चिमुकलीचा नाहक बळी घेणाऱ्या दोघा आरोपींना गजाआड केले.
0 टिप्पण्या