कोपरखैरणे हा पहिला कचराकुंडीमुक्त विभाग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

कोपरखैरणे हा पहिला कचराकुंडीमुक्त विभाग

स्वच्छतेत प्रत्येक नागरिकाचे सक्रीय योगदान महत्वाचे - नमुंमपा आयुक्त श्री. अभिजीत बांगर

            'स्वच्छ सर्वेक्षण 2021' अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांचा विभाग कार्यालयनिहाय आढावा घेण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सुरुवात केली असून आज कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या आढावा बैठकीत  त्यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घरात ओला व सुका कच-याप्रमाणेच घरगुती घातक कच-याचेही वर्गीकरण झाले पाहिजे यादृष्टीने गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामध्ये सोसायटी क्षेत्राप्रमाणेच झोपडपट्टी व गांवठाण विभागातील घरांतूनही कच-याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रभागनिहाय नेमलेल्या पथकांमार्फत अधिक प्रभावी कार्यवाही करावी असे सूचित केले.

            घरातूनच कचरा वर्गीकरण व त्याचे स्वतंत्र संकलन करणे अनिवार्य असून त्यानुसार गांवठाण व झोपडपट्टी भागात  कचरा संकलन करणा-या गाड्यांच्या वेळांचे नियोजन करावे व वेळांबाबतची माहिती तेथील नागरिकांना द्यावी तसेच गावठाण व झोपडपट्टी भागात घरगुती घातक कचरा संकलनासाठी ठराविक ठिकाणी लाल रंगाच्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्याचीही माहिती सर्व नागरिकांना द्यावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

            देशात पहिल्या क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवताना स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषानुसार शहर कचरा कुंडीमुक्त असणे महत्वाचे असून कोपरखैरणे हा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचराकुंडी नसलेला पहिला कचराकुंडीमुक्त विभाग असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र त्यासोबतच कचराकुंडी हटविलेल्या व सुशोभिकरण केलेल्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.  त्याचप्रमाणे इतर विभागांनीही कोपरखैरणे विभागाचे अनुकरण करावे असेही आयुक्तांनी सांगितले.

            कचरा वर्गीकरण व संकलनाप्रमाणेच कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट हा देखील अत्यंत महत्वाचा विषय असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरात निर्माण होणा-या ओल्या कच-याची खत टोपली (कंपोस्ट बास्केट) वापरून  विल्हेवाट लावावी व ते नैसर्गिक खत आपल्या कुंड्यांमधील वृक्षरोपे फुलविण्यासाठी वापरावे याकरिता विभाग कार्यालयाच्या प्रभाग पथकांनी  प्रभावी काम करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. अशाचप्रकारे दररोज 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच खत प्रकल्प राबवण्याची कार्यवाही करावी यासाठीही  ठोस प्रयत्न करावेत असे आयुक्तांनी सांगितले.

            तलावांचे जलाशय शहराच्या नावलौकीकाला योग्य असे स्वच्छ असावेत याकरिता सकाळी लवकर स्वच्छता करावी व नियमित स्वच्छता ठेवावी असे सूचित करत नाल्यांमध्ये कुणी कचरा टाकू नये याकरिता बसविण्यात येणा-या लोखंडी जाळ्या आवश्यक त्या सर्वच ठिकाणी बसवाव्यात असेही आयुक्तांनी निर्देशित केले.  त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी स्क्रीन बसवाव्यात व त्याठिकाणी साचलेला कचरा नियमित स्वच्छ करण्यासाठी नियोजन करावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

            सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष देण्यासाठी विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तपासणीसाठी शौचालये नेमून द्यावीत व त्यांनी नेमून दिलेल्या शौचालयात वेगवेगळ्या वेळी जाऊन सर्वेक्षणाच्या निकषानुसार स्वच्छतेची दैनंदिन तपासणी करावी आणि त्यामध्ये दिसून येणा-या त्रुटी संबंधीत कंत्राटदाराकडून दूर करून घ्याव्यात असे निर्देश आयुक्तांनी  दिले.

            नवी मुंबई शहराची स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिका आटोकाट प्रयत्न करीत असून यामध्ये नागरिकांनी माझा कचरा ही माझी जबाबदारी मानून सक्रीय सहभाग घेतला व घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार घरीच ओला, सुका व घरगुती घातक कच-याचे वर्गीकरण केले, तो वेगवेगळा दिला आणि त्याही पुढे जात खत टोपली वापरून आपल्या ओल्या कच-याची आपणच विल्हेवाट लावली तर नवी मुंबईच्या देशातील प्रथक क्रमांकाचे ध्येय साध्य होण्यास निश्चितच भरीव मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने स्वच्छता कार्यात आपला वाटा उचलून 'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.























प्रेस नोट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज