स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने होणार गांवठाण व झोपडपट्टी भागातील कचरा व्यवस्थापन
स्वच्छतेमधील मानांकन उंचविण्यासाठी १०० टक्के क्षमतेने काम करण्याची गरज असून आपण सध्या करीत असलेल्या कामाबाबत समाधानी राहून चालणार नाही, तर आपल्या कामात अधिक सुधारणा कशा होतील याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे व स्वत:ची क्षमता वाढवून काम केले पाहिजे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वच्छ सर्वेक्षण आढावा बैठकीप्रसंगी निर्देश दिले.
कच-याचे घरापासूनच १०० टक्के वर्गीकरण करण्याला कोणताही पर्याय नसून नागरिकांपर्यंत सातत्याने पोहचून त्यांची मनोभूमिका तयार करण्यावर अधिक भर द्यावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. या कामी स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी तसेच पथनाट्यांसारख्या उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा असे सूचित करण्यात आले.
नवी मुंबईत ठिकठिकाणी होत असलेल्या रंगरंगोटी, सुशोभिकरण कामांची नागरिकांकडून प्रशंसा केली जात असून नागरी भागाप्रमाणेच झोपडपट्टी व गावठाण भागातही सुशोभिकरण कामे करण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
गांवठाण व झोपडपट्टी भाग कचराकुंडी मुक्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत तेथील घरोघरी जाऊन ओला व सुका अशा वेगवेगळ्या स्वरुपात कचरा संकलन करणे व त्यातील ओल्या कच-याची विल्हेवाट लावणे अशी कार्यवाही तातडीने सुरु करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
प्रत्येक विभागातील घरोघरी होणारे कचरा वर्गीकरण, सोसायट्यांमधील कचरा वर्गीकरण, सोसायट्यांच्या आवारातील ओल्या कच-यावर प्रक्रिया प्रकल्प याचा सविस्तर आढावा घेताना यामध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक त्या सर्व संकल्पना राबवाव्यात व उपाययोजना कराव्यात असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता जनजागृती करण्यासोबतच त्याठिकाणी लावल्या जाणा-या उंच जाळ्या तसेच प्रवाहातील कचरा रोखण्यासाठी लावल्या जाणा-या स्क्रीन सर्व विभागांमधील नाल्यांच्या ठिकाणी लावाव्यात तसेच प्रामुख्याने तलावातही नियमित साफसफाई ठेवावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
ऐरोली येथील प्रत्यक्ष पाहणी दौ-याप्रसंगी दिवागांव याठिकाणी आढळलेल्या सार्वजनिक शौचालय अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी झोपडपट्टी व गांवठाण भागात जरी सार्वजनिक शौचालयांचा वापर जास्त असला तरी त्याठिकाणी कायम स्वच्छता राखणे गरजेचे आहे याची जाणीव करुन दिली. अनेक ठिकाणी शौचालयांची काळजी घेणारे केअर टेकर त्याच ठिकाणी राहत असल्याने तेथील काटेकोर स्वच्छतेबाबत त्यांना समज देण्यात यावी व नियमित पाहणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली असून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकला प्रतिबंध आहे त्या प्रकारच़्या प्लास्टिक प्रतिबंधाची कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अशाचप्रकारे विनापरवानगी अनधिकृत होर्डींग व बेवारस वाहने हटविण्याची कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सायन पनवेल महामार्गावर महापालिका हद्दीत सुरु असलेले स्वच्छता व सुशोभिकरण काम या आठवड्यात पूर्ण करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच स्वच्छता ॲपमध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण विहीत वेळेत करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असेही त्यांनी निर्देश दिले.
सार्वजनिक वाहतूकीच्या साधनांमध्ये डस्टबिन बसविण्याकडे विशेष लक्ष देत एन.एम.एम.टी. च्या सर्वच बसेसमध्ये डस्टबिन बसविण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच रिक्षा संघटनांशी संपर्क साधून रिक्षांवर स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती करण्याकरिता स्टिकर्स लावणे व रिक्षांमध्ये लहान डस्टबिन ठेवणेबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
स्वच्छतेच्या अनुषंगाने घरापासूनच ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवणे व महानगरपालिकेच्या कचरा गाडीत वेगवेगळा देणे ही बाब सर्वात महत्वाची असून त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिक व्यापक स्वरुपात प्रयत्न करावेत असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना निर्देश दिले.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा