कोव्हीड लसीकरण प्रक्रियेचा आयुक्तांनी घेतला आढावा
१६ जानेवारीपासून संपूर्ण देशात कोव्हीड-19 लसीकरण सुरु होणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाबाबतच्या नियोजनाचा सविस्तर आढावा आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच सिटी टास्क फोर्स समितीचे विविध सदस्य ऑनलाईन वेब संवादाद्वारे उपस्थित होते.
यापूर्वीच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोव्हीड-19 लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यालय स्तरावर अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली असून महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी विभागनिहाय 3 विभागीय नोडल ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत. हे विभागीय नोडल ऑफिसर आपापल्या विभागातील केंद्रांवर करण्यात येणा-या लसीकरण कार्यक्रमाचे नियंत्रण करणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने सध्याच्या शासकिय सुचनांनुसार ५० लसीकरण केंद्रांचे नियोजन केलेले असून त्याठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. या नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे रितसर प्रशिक्षणही पार पडलेले आहे.
०८ जानेवारी रोजी कोव्हीड-19 लसीकरणाची रंगीत तालीम (Dry Run) महानगरपालिकेच्या नेरुळ रुग्णालयात व्यवस्थितपणे पार पडलेली असून या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिका-यांनी प्रक्रियेचे अनुभव सांगितले. तसेच प्रात्यक्षिक स्वरुपातील प्रशिक्षण सत्रही इतर नियुक्त अधिका-यांसाठी घेण्यात आले.
केंद्रांवर नियुक्त प्रत्येक कर्मचा-याला आपल्याला करावयाच्या कामाची माहिती देण्यात आली असून केंद्रांवर काही अडचण भासू नये याकरिता राखीव कर्मचारी नेमणूक करून ठेवावेत व त्यांनाही प्रशिक्षण दिले जावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून कोव्हीड काळात आरोग्य विषयक सेवा देणा-या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांना लसीकरण केले जाणार असून १६ हजार ८५ कोव्हीड योध्यांची नोंद महानगरपालिकेकडे झालेली आहे. या कोव्हीड योध्यांना लसीकरण करणा-या केंद्रांवर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण केव्हा करण्यात येणार आहे याविषयी शासन स्तरावरून माहिती घेण्यात यावी व त्याचेही नियोजन करून ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले.
लसीकरण करताना कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या क्रमानेच लसीकरण करण्यात यावे आणि लसीकरण झाल्यानंतर व्यक्ती निरीक्षण कक्षात बसल्यानंतर त्यांच्याकडे ४ महत्वपूर्ण संदेशाचे हॅंडबिल देण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा, स्वच्छता व कोव्हीड नियंत्रक कार्यवाहीत सहभागी असलेले इतर महानगरपालिका कर्मचारी अशा प्रत्यक्ष कृतिशील असणा-या फ्रन्टलाईन कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार असून त्याविषयी माहिती घेऊन आधीच नियोजन करून ठेवावे असे आयुक्तांनी सांगितले.
लस साठवणूकीसाठी निश्चित केलेले तापमान सेंट्रल कोल्ड स्टोअर येथे कायम राखण्यासाठी पॉवर बॅकअपची सुविधा तपासून घेण्याचे निर्देश देतानाच आयुक्तांनी सदर लसीची कोल्डचेन साठवणूकीच्या टप्प्यापासून वितरण होईपर्यंत व उरलेल्या लस परत घेऊन त्याचीही साठवणूक करण्याची कार्यवाही काटेकोरपणे व्हावी असे आदेश दिले. यामध्ये प्रत्येक टप्प्यावरील जबाबदारी निश्चित करावी व यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
१६जानेवारी रोजी होणा-या कोव्हीड-19 लसीकरणासाठी महानगरपालिकेची वाशी व ऐरोली ही २ सार्वजनिक रुग्णालये तसेच नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल तसेच खैरणे एम.आय.डी.सी. येथील रिलायन्स हॉस्पिटल अशी ५ लसीकरण आरंभ केंद्रें (Launch Site) निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच महापालिका क्षेत्रात एकूण ५० लसीकरण केंद्रांची तयारी करण्यात आलेली आहे.
कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मींना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे याचा संदेश मोबईलवर प्राप्त होणार असून प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरण हा आरोग्य विभागासाठी नेहमीचा विषय असला तरी कोव्हीड लसीकरण ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने या लसीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या बैठकी प्रसंगी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा