धारावी 'रोल मॉडेल' म्हणून जागतिक स्तरावर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १२ जुलै, २०२०

धारावी 'रोल मॉडेल' म्हणून जागतिक स्तरावर

धारावी 'रोल मॉडेल' म्हणून जागतिक स्तरावर

एकात्मिक प्रयत्नांना यश

मुंबई, दादासाहेब येंधे : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीनर स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नांतून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले, एवढेच नाही तर कोरोना विरुद्धच्या लढ्यातील "रोल मॉडेल" म्हणून जागतिक स्तरावर आपले नावही नोंदविले गेले. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बद्दल धारावीचे कौतुक केले.
आशियातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या या झोपडपट्टीत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांवर गेले असून आज घडीला १६६ आहे. या स्वयंशिस्तीचा आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेएसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली, त्यांची उदाहरणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा उल्लेख केला. जागतिक महामारीच्या परीस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
धारावीत प्रामुख्याने चामडे व्यवसाय, कुंभारकाम, कापड व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या परिसरात जीएसटीचे पाच हजारहून अधिक नोंदणीकृत व्यवसायिक आहेत. आंतरराष्ट्रीय निर्यातीचे केंद्र म्हणून धारावी कडे पाहिले जाते. येथे १० बाय १० च्या घरात आठ ते दहा लोक राहतात. इथल्या लोकसंख्येच्या ८० टक्के नागरिक हे सामूहिक शौचालयांचा वापर करतात. बहुतेक नागरिक हे बाहेरील खाण्या-पिण्यावर अवलंबून आहेत. अशा धारावीत कोरोना मुक्तीचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. स्थानिक धारावीकर, मुंबई महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पाहावे लागेल. साथ नियंत्रणासाठी स्थानिकांचा सहभाग मिळवणे, चाचणी करणे, रुग्णांना शोधणे त्यांचे अलगीकरण करून योग्य उपचार करणे, शारीरिक अंतरांच्या नियमांचे, स्वच्छतेचे आणि स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते, हेच धारावीमध्ये दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलची प्रसंशा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांना एकात्मिक प्रयत्नाचे कौतुक करताना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाबासकी दिली.




1 टिप्पणी:

  1. मुंबईकरांनी, धारावीकरांनी, महापालिकेने, मुंबई पोलीस, डॉक्टर, स्थानिक कोरोना योद्धे यांनी करून दाखवले.

    उत्तर द्याहटवा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज