जोरदार लाटांमुळे वाहून आलेले नैसर्गिक लहान खडक व कचरा पातमुखात अडकल्याने थांबला होता निचरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, २९ जुलै, २०२३

demo-image

जोरदार लाटांमुळे वाहून आलेले नैसर्गिक लहान खडक व कचरा पातमुखात अडकल्याने थांबला होता निचरा

पाटणजैन मार्गाचे पातमुख महानगरपालिकेच्या यंत्रणेने काही मिनिटात केले मोकळे


चर्चगेट-मरीन लाइन्स दरम्यान रेल्वे रुळांवरील पाण्याबाबत मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर होणाऱया आरोपात अजिबात तथ्य नाही, प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण


दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु असतानाच जोरदार लाटांसोबत वाहून आलेले नैसर्गिक लहान आकाराचे खडक पाटणजैन मार्गाच्या पर्जन्य जल पातमुखात (आऊटफॉल) अडकले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ए विभाग, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि पर्जन्य जल वाहिन्या विभाग यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हे पातमुख मोकळे केले. सबब, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे सदर रुळांवर पाणी आल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

IMG_20230729_112124


चर्चगेट ते मरिन लाइन्स दरम्यान रेल्वे रुळांवर जोरदार पावसाचे पाणी काही प्रमाणात साचल्याचे दर्शवणारी चित्रफीत तसेच सदर प्रकार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या बांधकामातून निघालेल्या राडारोड्यामुळे (डेब्रीज) घडल्याचा आरोप करणारा एक संदेश समाज माध्यमातून तसेच प्रसार माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे. मात्र, या आरोपांमध्ये मुळीच तथ्य नाही. या घटनेबाबतची वस्तुस्थितीदर्शक माहिती पुढीलप्रमाणे आहे.


पाटणजैन मार्गावरील पर्जन्य जल मार्गाचे पातमुख बंद होवून चर्चगेट ते मरिन लाइन्स दरम्यान रेल्वे रुळांवर जोरदार पावसाचे पाणी काही प्रमाणात साचल्याचा संदेश महानगरपालिकेकडे प्राप्त झाला. त्यानंतर तत्काळ हालचाली करुन तसेच रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून महानगरपालिकेचा ए विभाग, पर्जन्यजल वाहिन्या आणि मुंबई किनारी रस्त्याच्या चमूने या ठिकाणी संयंत्र व मनुष्यबळ नेवून पाहणी केली. त्यावेळी निदर्शनास आले की,


१) पातमुख असलेले ठिकाण हे मुळात मुंबई किनारी रस्त्याच्या बांधकाम हद्दीच्या पलीकडे आहे. त्यामुळे किनारी रस्त्याच्या बांधकामाचा राडारोडा या पातमुखात अडकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रकल्प बांधकाम परिसरातील सर्व पातमुख मोकळे राहतील, याची दक्षता प्रकल्पाचे बांधकाम सुरु असल्यापासून सर्वत्र घेतली जाते


२) मुळात, समुद्राला भरती असताना मोठा लाटा किनाऱयाला धडकतात. अशावेळी किनारी भागात समुद्र तळाशी असणारे नैसर्गिक लहान खडक देखील वाहून येतात. असे काही लहान खडक तसेच लाटांसोबत आलेला कचरा या पातमुखात अडकला होता. हा नैसर्गिक प्रकार आहे. त्याचा महानगरपालिकेच्या कामकाजाशी संबंध जोडणे अनाठायी आहे.


३) नेताजी सुभाष रस्त्याला मिळणाऱ्या पाटणजैन मार्गाचे पर्जन्य जल पातमुख या खडक व कचऱयामुळे बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या ए विभाग, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि पर्जन्य जल वाहिन्या विभाग यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून सदर पातमुख जेसीबीच्या सहाय्याने तत्काळ मोकळे केले. त्यासोबतच, अधिक क्षमतेचे पंप लावून पाण्याचा पूर्णपणे निचरा देखील केला. समुद्राला भरती असतानाच जोरदार पाऊस देखील सुरु होता, त्याचवेळी पातमुखात खडक अडकल्याने सदर प्रकार घडला.


ही वस्तुस्थिती लक्षात घेता मुंबईकरांनी चुकीच्या संदेशांवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



(जसंवि/२४०) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *