मुंबईत गेल्या आठवड्यात एक कोटी ६४ लाखांचे अंमली पदार्थ जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

मुंबईत गेल्या आठवड्यात एक कोटी ६४ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

 अंमली पदार्थ विरोधी कक्षाची जबरदस्त कामगिरी


मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गेल्या आठवड्यात शहरात विविध ठिकाणी छापेमारी करून एक कोटी ६४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.



कांदिवलीतील चारकोप आणि महावीर नगर, गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलजवळ, माहीम (पश्चिम), डोंगरीतील जेलरोड आणि चेंबूर मधील टिळक नगर येथे १४ एप्रिल ते २२ एप्रिल यादरम्यान अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या कांदिवली, वरळी, वांद्रे आणि घाटकोपर कक्षाने ही कारवाई केली आहे. त्या कारवाईप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सात ड्रग्स तस्करांना अटक करण्यात आली आहे.


कांदिवलीतील महावीर नगर मध्ये छापेमारी करून २९ वर्षीय ड्रग्स तस्कराकडून २८ लाख रुपये किमतीचा २८० ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला.  कांदिवली कक्षाने १४ एप्रिलला ही कारवाई केली तर कांदिवली कक्षाने २२ एप्रिलला चारकोप गाव येथे कारवाई करत ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचे एक किलो २३० ग्रॅम चरस विक्रीसाठी घेऊन आलेल्या २९ वर्षीय तस्कराला ताब्यात घेत अटक केली आहे.


वरळी कक्षाने १८ एप्रिलला गोरेगावातील ओबेरॉय मॉलच्या बाजूला ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून २७ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ९२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. बालसुधारगृहाजवळ वांद्रे कक्षाने १९ एप्रिलला कारवाई करत २५ आणि ३३ वर्षीय ड्रग्स तस्कराकडून ३४ लाख रुपये किमतीचे १७० ग्रॅम एमडी जप्त केले आहे.


तर घाटकोपर कक्षाने २० एप्रिलला धारावी-माहीम रोडवर ३९ वर्षीय ड्रग्स तस्कराला १४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ७२ ग्रॅम एमडीसह अटक केली. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी नवीन टिळक नगर येथून ३८ वर्षीय ड्रग्स तस्कराला २२ लाख ४० हजार रुपयांच्या एमडी ड्रग्ससह ताब्यात घेत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज