‘कोविड’ रुग्णांची संख्या घटल्यामुळे ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचे निश्चित - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

demo-image

‘कोविड’ रुग्णांची संख्या घटल्यामुळे ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचे निश्चित

पहिल्या टप्प्यात ३ केंद्रे यापूर्वीच बंद, तर दुस-या टप्प्यात ५ केंद्रे बंद करणार 

तथापि, सेव्हन हिल्स रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत

‘कोविड’ साथरोगाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोविड’ बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध ८ ठिकाणी ‘कोविड जम्बो केंद्रे’ कार्यरत होती. या ८ ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये १२ हजार ३७५ रुग्‍णशय्या व ९०७ अतिदक्षता रुग्‍णशय्या होत्या. या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. परिणामी, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोविड’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणा-या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले. यानुसार पहिल्या टप्प्यात ३ ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ बंद केली. तर आता दुस-या टप्प्यात आणखी ५ केंद्रे बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, ‘कोविड’ बाधा झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने सेव्हन हिल्स रुग्णालयासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. 

bmc1


याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, ‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोविड केअर सेंटर’ यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुस-या टप्प्यात वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.


‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्यात येत आहेत. तथापि, नव्याने आढळून येणा-या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ रुग्णशय्यांची उपलब्धता असून आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे.     


 जसंवि/ १८६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *