१ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवासाची मुभा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

१ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवासाची मुभा

 सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळणे बंधनकारक

मुंबई, दादासाहेब येंधे : कोविड-१९ च्या संकटामुळे तब्बल दहा महिन्यांपूर्वी बंद असलेली व नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १ फेब्रुवारी पासून सर्वांसाठी सुरू होणार आहे. पण, प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. असे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलं आहे. त्यामुळं मुंबईसह आसपासच्या शहरांत राहणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागानं हे पत्रं लिहिलं आहे. त्याद्वारे सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला करण्यात आली आहे. रेल्वेला ही सूचना करतानाच मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई व उपनगरांतील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळा बदलाव्यात, असेही आवाहन सरकारनं केलं आहे. 

कधी करता येणार प्रवास : सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. 

कधी प्रवास करू शकणार नाही : सर्वसामान्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळेमध्ये फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासीच प्रवास करू शकतील.

दुकाने तसेच उपहारगृहे वेळ : मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज