चटका लावणारी एक्झिट !
मुंबई, दादासाहेब येंधे : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने काल निधन झाले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात काल पहाटे १.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रसिकमनाला त्यांचे जाणे धक्का देणारे आहे. तीन पिढ्यांमध्ये सळसळत्या उत्साहाने, हसतमुख, टवटवीत असणार्या रवी पटवर्धन यांचं जाणं मनाला पटत नाही. 'अग्ग बाई सासूबाई' या मालिकेद्वारे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कलेची सेवा केली.
भारदस्त व्यक्तिमत्व, दमदार तितकाच धीरगंभीर स्वछ, सुस्पट आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेले रवि पटवर्धन यांनी अभिनयाच्या विविध कंगोर्यांनी आपल्या भूमिकेला न्याय तर दिला.
रसिकांच्या काळजात त्यांना स्थान तर होतेच; शिवाय मराठी सिने नाट्यसृष्टीत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली ते अगदी जीवनाच्या अंतापर्यंत, वयाच्या ८३ पर्यंत प्रदीर्घकाळ कलेची सेवा त्यांनी केली, तीही आपली नोकरी सांभाळून. जुन्या नव्या गाजलेल्या सुमारे शंभरावर नाटकातून तर दोनशेहून अधिक चित्रपट, मालिकांमधून तर काही स्वनिर्मिती करून त्यांनी आपल्या भूमिका सादर केल्या.
झुबकेदार मिशांमुळे पोलिस पाटील, पोलिस अधिकारी, न्यायाधीश, तसेच काही नकारात्मक भूमिका त्यांना नेहमी मिळायच्या. त्यांचे स्मितहास्य, भूमीकेतील बेरकीपणा, आणि पहाडी आवाज, सहज सुंदर अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक कायम लक्षात राहील. गप्पागोष्टितील त्यांचा 'वस्ताद पाटील' आजही रसिकांच्या मनात घर करून आहे, राहणार आहे. त्यांनी सिनेनाट्य सृष्टीला दिलेले योगदान, रसिकांना दिलेला आनंद आणि त्यांचे स्मितहास्य, व्यक्तिमत्व रसिकांच्या मनात कायम चिरंजीव राहील.

0 टिप्पण्या