मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कांदिवली परिसरातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन कोटी २५ लाख रुपये किमतीचे ६५१ ग्रॅम हेरोइन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ड्रग्ज विक्रीतून कमावलेली दोन लाख १० हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून 'अमली पदार्थमुक्त मुंबई' मोहीम राबवली जात असून, गुन्हे शाखेची पथके ड्रग्ज विक्री आणि तस्करीवर लक्ष ठेवून आहेत. कांदिवली परिसरात काही जण ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-११ ला मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलिस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या पथकाने कांदिवली पश्चिमेकडील महापालिका उद्यानाजवळ सापळा रचला. तेथे संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्या जवळ ६५१ ग्रॅम हेरोइन आढळले. आरोपी हे ड्रग्ज कोणाला विकण्यासाठी आले होते, याचा तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या