Ticker

6/recent/ticker-posts

लालबागमध्ये आईची हत्या करून शरीराचे केले तुकडे

स्वतःची मुलगीच बनली हैवान 


मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी पोलीस स्टेशन अंतर्गत लालबाग येथून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे इब्राहिम कासम इमारतीत राहणाऱ्या २३ वर्षीय रिंपल जैन या मुलीने तिच्या ५५ ​​वर्षीय आई वीणा प्रकाश जैन यांची हत्या केली. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी काल रिंपल या मुलीला अटक केली असून तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. 


पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता व चाकू जप्त केला असून आरोपी मुलीने या धारदार शस्त्राच्या सहाय्याने महिलेच्या शरीराचे पाच तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तिच्याच घरातील कपाटात व लोखंडी पाणीच टाकीत ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी वीणा जैन यांच्या भावाची मुलं दर महिन्याच्या खर्चासाठी पैसे देण्यासाठी इब्राहिम कासम चाळीतील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी विना जैन यांची मुलगी रिंपल ही दरवाजा उघडत नसल्याने वीणा यांच्या मोठ्या भावाची पत्नी आणि दुसऱ्या भावाची पत्नी राहत्या घरी मुलांसह आल्या. त्यावेळी भावाच्या मुलाने दरवाजावर जोरदार धक्का देऊन दरवाजा उघडला. मागील काही महिने वीणा यांचा भाऊ तिच्या खर्चाचे पैसे चाळीच्या खाली येऊन देत असे. मात्र या महिन्यात भावाची मुलगी पैसे देण्यासाठी गेली असता रिंपलने दरवाजा उघडला नाही. दरम्यान, वीणा यांच्या भावजयांना संशय आल्यानंतर त्यांनी याची माहिती पतीला दिली. वीणा जैन यांचा थोरला भाऊ सुरेशकुमार हा रिंपलसह काळाचौकी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार देण्यास आले. त्यावेळी रिंपलने आई कानपूरला गेली असल्याचे सांगत बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. 


गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शेजारी राहणारी लोकं देखील रिंपलच्या घरातून दुर्गंध येत असल्याबाबत चर्चा करत असून त्याची माहिती रिंपलच्या मामाला दिली होती. मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर ताबडतोब काळाचौकी पोलिसांचे पथक इब्राहिम कासम चाळीतील घरी पोहोचले आणि त्यांना लोखंडी कपाटाच्या तळघरात विना जैन यांच्या मृतदेहाचा एक भाग कूजलेल्या अवस्थेत एका प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला. त्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यानंतर बाथरूममध्ये स्टीलच्या टाकीत साडीत गुंडाळलेले वीणा याच्या शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व भाग एकत्र करून केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यासाठी घटनास्थळी सेंट्रल इन्वेस्टीगेशन टीम आणि फॉरेन्सिक टीम यांना पाचरण करून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आरोपी रिंपलने आपली आई वीणा जैन २७ डिसेंबर रोजी घराबाहेर असलेल्या शौचालयाच्या जवळ असलेल्या गॅलरीतून खाली पडली असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला उचलण्यासाठी रिंपलने खाली असलेल्या चायनीज हॉटेलमधील दोन कामगारांची मदत घेतली. या दोन कामगारांची देखील काळाचौकी पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे पोलिसांचा असा अंदाज आहे की, २७ डिसेंबरला वीणा जैन यांची हत्या करण्यात आली असून त्यानंतर तिचे तुकडे करून घरात ठेवण्यात आले होते. काळाचौकी पोलिसांनी भादवि कलम ३०२, २०१ सह कलम ४, ७, २५, २७ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.


        









Photo : viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या